Latest

सावधान…! तुमच्या ‘मेसेज’वर आहे पोलिसांची नजर

अमृता चौगुले

महेंद्र कांबळे

पुणे : सोशल मीडियावरील अश्लील मजुकरांवर पोलिसांची करडी नजर आहे. या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार वाढत असून वर्षभरात सायबर पोलिसांना तब्बल 4357 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अश्लील, घाणेरड्या भाषेतील कमेंटवर पोलिसांचे लक्ष असून, असा एखादा आक्षेपार्ह संदेश आढळल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला कारागृहाची हवा खाण्यास पाठवू शकतो.

गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराकडून तिचा व्हिडीओ, तिच्याबद्दल वाईट मेसेज सामाजिक माध्यमांवर पसरवून आपला राग व्यक्त करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. एकीकडे बदनामीचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात पुरुषांना ओढून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचेही सर्रास प्रकार शहरात घडताना दिसत आहेत.

या तक्रारींनी वाढविले काम..

2021 मध्ये फेसबुक, इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून बनावट प्रोफाईल बनवणे, अश्लील कमेंट व पोस्ट करणे, तसेच माहिती चोरल्याच्या 1 हजार 514 तक्रारी पुणे सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मित्र बनवून फसविल्याचे 263 प्रकार, नग्न व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनच्या 682 तक्रारी, फेसबुक प्रोफाईल हॅक करून अश्लील मेसेज पोस्ट केल्याच्या 465 तक्रारी पुणे सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.

इतर सामाजिक माध्यमांचा विचार करता व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील कमेंटच्या 466, सामाजिक माध्यमांवर मोबाईल नंबर पोस्ट केल्याच्या 12, ई-मेलद्वारे अश्लील संदेशाच्या 73, यू-ट्यूबवर अश्लील व शिवराळ व्हिडीओ अपलोड करण्यासंदर्भातील 48, सामाजिक माध्यमांवर बदनामीकारक व्हिडीओ अपलोडच्या 144 तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. कोरोनाबद्दल अफवा पसरविल्याच्या 6, बदनामीकारक पोस्ट समाजमाध्यमांवर पसरविल्याच्या 314 तक्रारी, झूम मीटिंग सुरू असताना घाणेरड्या कमेंटच्या 10 तक्रारी, बनावट ई-मेल आयडी तयार केल्याच्या 88, सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह धार्मिक कमेंटच्या 80 तक्रारी आहेत. मॉर्फिंगसंदर्भात तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. अशा सर्व मिळून मागील वर्षअखेर 4 हजार 357 तक्रारी आल्या होत्या. तर त्यातील 1 हजार 474 तक्रारी प्रलंबित होत्या.

संमतीशिवाय मेसेज पाठविणे पडू शकते महाग

तुम्ही जर घाणेरड्या कमेंट आणि अश्लील फोटो सामाजिक माध्यमांवर करीत असाल, तर तुमच्यावर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते. आयटी अ‍ॅक्टच्या कलम 66 ए नुसार खोट्या आणि आक्षेपार्ह कमेंट केल्यास कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. तुम्हाला जर तुमच्या सहमतीशिवाय कोणी फोटो, व्हिडीओ पाठवत असेल आणि त्यामध्ये त्रास देणे, धोका, अपमान, दोन गटांमध्ये तणाव तसेच गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असेल तर कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

समाज माध्यमांवर व्यक्त होताना कोणाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याचा परिणाम तुमच्या करिअरवरही होऊ शकतो. समाज माध्यमांवर व्यक्त होताना जरा सांभाळूनच व्यक्त व्हा.
                                             – डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस

पोलिस म्हणतात, ही काळजी घ्या

  • सामाजिक माध्यमांवर मेसेज अथवा कमेंट करू नका
  • दोन समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश पाठवू नका
  • आक्षेपार्ह संदेश आला असेल तर त्याचा स्क्रिनशॉट काढा
  • आक्षेपार्ह मोबाईल नंबरला लगेच ब्लॉक करून पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT