बेळगाव

एकीचे बळ, घुमले मराठा वादळ!, भव्य शोभायात्रेसह गुरुवंदनला प्रतिसाद

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : शिवरायांच्या आसनारूढ पुतळ्यासह सजलेला हत्ती…स्वामींचे सजवलेले रथ, सजलेले घोडे… झांजपथकाचा झंझावात… हलगी-ताशांसह घुमणारी तुतारी… एका लयीत उठणारा टाळ मृदंगाचा सूर अन् या सर्वांसमोर दिमाखात डौलणारे भगवे ध्वज… असेच काहीसे जल्लोषपूर्ण वातावरण रविवारी दिसले. गुरुवंदनच्या निमित्ताने एकवटलेल्या जनसागराने जणूकाही मराठा वादळाचीच अनुभूती दिली.

महिनाभरापासून तयारी अन् गेल्या पंधरा दिवसांपासून आयोजकांनी उठवलेले रान यशस्वी झाले. कारण, रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाज एकत्रित होण्यास प्रारंभ झाला. ऊन चढेल तशी गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढतच गेली. कपिलेश्‍वर उड्डाण पुलापासून शिवाजी उद्यान परिसर व संपूर्ण शोभायात्रेच्या मार्गावर दुतर्फा भगवे ध्वज डौलाने फडकत होते. येथे येणार्‍या प्रत्येकाच्या डोकीवर 'सकल मराठा समाज' अशी लिहिलेली भगवी टोपी व असेच लिहिलेला बिल्ला प्रत्येकाच्या खिशावर झळकत होता.

नऊवारी साडीसह ऐतिहासिक पेहरावात सजलेल्या महिला, तरुणी व शाळकरी मुली देखील लक्ष वेधून घेत होत्या. शोभायात्रेला साजेसे वेष केलेले पुरूषही उठून दिसत होते. हत्ती, रथ, भगवे ध्वज, झांजपथक, टाळ मृदुंगासह निघालेली ही शोभायात्रा डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. आदर्श विद्यामंदिर वडगाव येथील मैदानावर झालेल्या मुख्य गुरूवंदना कार्यक्रमातही मंडपाबाहेर गर्दी ओसंडून वाहत होती. पक्षभेद, वैयक्तीक मतभेद विसरून एकटवटलेले हजारो मराठाजन हे या एकूण समारंभाचे आकर्षण ठरले.

पहिल्यांदाच 'मराठा' एकत्र

महाराष्ट्र एकीकरण समितीसह भाजप-काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने विखुरलेला आहे. परंतु, आजतागायत मराठा समाजाने आपला असा स्वतंत्र कार्यक्रम कधीच घेतला नव्हता. तो पहिल्यांदा घेतला अन् त्याला अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला. बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके, कागवाडचे आ. श्रीमंत पाटील, खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून मराठा समाजाचा कार्यक्रम म्हणून एकत्रित आले. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाला जागे करायचे असेल, तर ही एकी यापुढेही अशीच टिकून राहायला हवी अन् भविष्यात यापेक्षाही मोठा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी व्यक्‍त केली.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT