Zero Shadow Day  
बेळगाव

Zero Shadow Day | निपाणी परिसरात सोमवारी 'शून्य सावली' दिवस, कुठे व कधी पाहा?

खगोलशास्त्रीय दुर्मिळ घटना; कुर्लीसह परिसरातही दिसणार

पुढारी वृत्तसेवा

कुर्ली: आपण पृथ्वीवर अनेक खगोलीय घटना अनुभवत असतो. काही घटना हवामानामुळे स्पष्ट दिसतात, तर काहींचे निरीक्षण करणे अवघड जाते. अशाच घटनांपैकी 'शून्य सावली दिवस' हा एक रंजक आणि दुर्मिळ अनुभव आहे. बेळगाव जिल्ह्यात २ मेपासून सुरू होणारा हा सावल्यांचा खेळ ७ मेपर्यंत पाहता येणार आहे. सूर्य डोक्यावर आल्यानंतर वस्तू किंवा व्यक्तीची सावली पुढे-मागे न पडता पायाखाली पडते. काही क्षणांसाठी ही सावली पूर्णपणे नाहीशी होते, त्याला 'शून्य सावली' असे म्हणतात.

सध्या उत्तरायण असल्याने कडक उन्हाचा कालावधी सुरू असून निपाणी परिसरात ५ ते ७ मैकाळात ग्रामीण भागात हा अनुभव घेता येणार असल्याची माहिती सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी दिली. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवतीही परिभ्रमण करते. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कललेला असल्यामुळे ऋतू बदलतात आणि उत्तरायण-दक्षिणायन घडते.

उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त याकाळात सूर्य वर्षातून दोनदा बरोबर डोक्यावर येतो. त्यावेळी दुपारी सरळ उभ्या वस्तूची सावली पायाखाली पडते आणि काही क्षणांसाठी नाहीशी होते. रेखांश-अक्षांशाचा प्रभाव भारतामधून कर्कवृत्त सुमारे २३.५ अंश अक्षांशावरून जाते. त्यामुळे या रेषेच्या दक्षिणेकडील भागातच शून्य सावलीचा अनुभव येतो. दिल्ली, हिमाचल, काश्मीरसारख्या उत्तर भागात हा अनुभव मिळत नाही. जूननंतर दक्षिणायन सुरू झाल्यावर जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा सूर्य डोक्यावर येतो. पान पावसाळ्यामुळे निरीक्षण कठीण होते. बेळगाव जिल्ह्यातील विविध भाग १५ ते १७ अंश रेखांश व ७४ ते ७६ अंश अक्षांश काळात येत असल्याने ४ ते ६ मेकाळात दुपारी साधारण १२.२७ ते १२.२९ यावेळेत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.

सावलीचे निरीक्षण कसे करावे?

आकाशात घरासमोर किंवा टेरेसवर सपाट पृष्ठभागावर एखादी सरळ वस्तू ठेवावी. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर त्या वस्तूची सावली कशी पायाखाली येते आणि काही क्षणांसाठी नाहीशी होते, याचे निरीक्षण करता येते. पण यावेळी सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. निपाणीसह परिसरात ५ मे रोजी दुपारी १२.२९ वाजता 'शून्य सावली दिवस' अनुभवण्याचे आवाहन चौगुले यांनी केले आहे.

निवडक ठिकाणे व वेळा :

४ मे - गोकाक : १२.२७ ५ मे - मुडलगी : १२.२७ ५ मे - चिकोडी, हुक्केरी, संकेश्वर : १२.२८ ५ मे - निपाणी, खडकलाट, अकोळ, शेंदूर, कुर्ली, सौदलगा: १२.२९ ६ मे - अथणी: १२.२६ ६ मे - ऐनापूर, रायबाग, कागवाड: १२.२७ ६ मे - सदलगा : १२.२८ ६ मे - कोगनोळी, बेनाडी : १२.२१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT