बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न म्हणून रहदारी नियमांचे उल्लंघन करणार्यांना यापुढे नोटीस बजावण्याऐवजी त्यांचा चालक परवाना रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री आपत्कालीन सेवेअंतर्गत 45 नव्या रुग्णवाहिकांचे उद्घाटन करून सिद्धरामय्या बोलत होते. सध्या 45 कोटी रुपये आरोग्य विभागाला देण्यात आले असून, त्यातून 65 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सर्वसामान्य लोक आणि वाहनधारक नियमांचे पालन करत नाहीत. रहदारी नियमांचे पालन होणार नाही, तोपर्यंत अपघाताच्या प्रमाणात घट होणार नाही. रहदारी व्यवस्थेसाठी कडक नियम असले तरी उल्लंघनाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. काहींच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पापांना जीव गमवावा लागतो. वाहतुकीचे नियम पाळले, तर बहुतांश अपघात टाळता येतात. मद्यप्राशन करून वाहने चालवण्याच्या आणि मोबाईलवर बोलण्याच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्यात यावा. सर्व प्रकारच्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. नियमांचे उल्लंघन करणार्यांचा परवाना रद्द करण्यात यावा, असे ते म्हणाले.
परदेशात वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची व्यवस्था आहे. त्याप्रकारच्या नियमावली लादण्यात येतील. उल्लंघन करणार्यांवर नोटीस देऊ नका. थेट परवाना रद्द करून गैरप्रकार करणार्यांवर न्यायालयात हजर करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. इथे लघुशंका करू नका, असा फलक लावला असेल तर त्याचठिकाणी लोक लघुशंका करतात. लोकांनी अशी वृत्ती सोडली पाहिजे. सर्वांनी वाहने सुरक्षित स्थितीत ठेवावीत. वाहनांची वेग मर्यादा 80 किमी प्रतितास असेल तर 120 किमी वेगाने गाडी चालवतात. अपघातात तरुण आणि विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला, तर कुटुंबांना त्रास होतो. राज्यात दरवर्षी 40 हजार अपघात होत आहेत. त्यात 9 ते 10 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघात कमी करण्यासाठी 2017 मध्ये रस्ता सुरक्षा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.