बेळगाव

कर्नाटक : …तोपर्यंत संतोषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही ; कुटुंबीयांचा निर्धार

मोनिका क्षीरसागर

बेळगाव (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा
कंत्राटदार संतोष पाटीलने आत्महत्येसाठी ग्रामीण विकासमंत्री ईश्‍वरप्पा यांना जबाबदार ठरवले आहे. त्यामुळे त्यांना अटक होईपर्यंत संतोषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असे संतोषचे चुलत भाऊ प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री ईश्‍वराप्पा यांच्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केली आहे. त्यांना अटक झालीच पाहिजे, अशीही मागणी प्रशांतने केली आहे. तसेच भावाच्या आत्महत्येची माहिती मिळताच प्रशांतने तातडीने कॅम्प पोलिस स्थानक गाठले आणि मंत्री ईश्‍वरप्पांविरुद्ध तक्रार घेण्याचा आग्रह केला. मात्र आत्महत्येची घटना उडपीत घडल्यामुळे गुन्ह्याची नोंद बेळगावात करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगून प्रशांतला परत पाठवले. पोलिस स्थानकावरून परतताना प्रसार माध्यमांनी गाठल्यानंतर प्रशांतने ही माहिती दिली. हे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.

संतोषच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा तसेच मोठा भाऊ, भाऊजय असा परिवार आहे. संतोषचा मोठा भाऊ बसनगौडा पाटील बंगळूर येथे पीएसआय, बसनगौडा यांची पत्नी म्हणजे संतोषची भावजय सीपीआय आहे. प्रशांत हा चुलत भाऊ असून, तो बेळगावात राहतो. मृत्यूची माहिती कळताच संतोषचे कुटुंबीय उडपीला रवाना झाले आहेत. संतोष पाटील मूळ बडस (खालसा) येथील असून त्याचे शिक्षण मात्र करोशी व चिकोडी येथे झाले. संतोष करोशी येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य व हेस्कॉमचे संचालक महेश भाते यांच्या मेहुण्याचा मुलगा. संतोष त्यांच्याच म्हणजे आपल्या आत्याच्या घरी राहत होता. करोशी येथील सीएलई संस्थेच्या हायस्कूलमधून दहावी, तर चिकोडी सी. बी. कोरे पॉलीटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल विभागात डिप्लोमा शिक्षण घेतले.

संतोष आधी चिकोडी एनएसयूआय अध्यक्ष, नंतर कर्नाटक युवा संघटनेचे अध्यक्ष व एबीव्हीपी संघटनेचा अध्यक्ष बनला होता. डिप्लोमानंतर संतोषने करोशी व चिकोडीतून कामाला सुरुवात केली. 2008 साली तो करोशीतून बेळगावला स्थलांतरित झाला होता. संतोषच्या घरी आई, पत्नी व दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. संतोष अलीकडच्या काही वर्षात बेळगाव-हिंडलगा परिसरात कंत्राटदार म्हणून काम करीत होता.

सरकार या प्रकरणात कसलाही हस्तक्षेप करणार नाही. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून तपास करावा. सर्व बाजूंनी तपास करून निर्णय घेण्याची पोलिसांना मुभा दिलेली आहे
-बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री

ही डेथनोट नसून फक्त एक संदेश आहे, त्यामुळे याची चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल
-अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री

राज्यात खरोखरच डीजीपी असतील तर त्यांनी तातडीने ईश्‍वराप्पा यांना अटक करावी.
-डी. के. शिवकुमार, केपीसीसी अध्यक्ष

मंजुरी नसलेल्या कामासाठी कमिशनचा आरोप : ईश्वरप्पा

बेळगावात कोणत्याही रस्ताकामाला मंजुरी दिली नाही. तशी प्रक्रियाही सुरु नाही. त्यामुळे कमिशन मागितल्याचा आरोप केलाच कसा, असा प्रश्न ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी उपस्थित केला.
येथे ते पत्रकारांशी बोलत होते. संतोष पाटील या बेळगावच्या कंत्राटादाराने ईश्वरप्पांच्या नावे संदेश रवाना करुन आत्महत्या केल्याबाबत ते म्हणाले, ग्रामीण विकास खात्याच्या सचिवांनी हाती घेतलेल्या कामांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पण, संतोष पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख कुठेही नाही. संबंधित कामाला मंजुरी दिली नाही. संतोष यांनी याआधी आपल्यावर कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. 15 मार्च रोजी न्यायालयाने सुनावणीस सुरुवात केली. 19 रोजी युक्तिवाद ऐकून म्हणणे जाणून घेतले आहे. कोणतेही रस्ताकाम झाले नसले तरी त्यासाठी कमिशनचा आरोप करण्यात आला आहे. सरकारी आदेशाशिवाय कोणतेही काम हाती घेतले जात नाही. त्यामुळे काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे ईश्वरप्पा यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT