बेळगाव

निपाणी : बहिणीच्या लग्नाला भाऊ मुकला ; तवंदी घाटातील अपघातात वधूच्या भावासह काका-काकू, आजी ठार

अविनाश सुतार

निपाणी : मधुकर पाटील : लग्नसोहळा हा आनंदाचा, उत्साहाचा आणि जीवनाला रंग भरणारा एक जणू अविस्मरणीय प्रसंग. लग्नसोहळा म्हटल्यानंतर नवरा मुलगा आणि नवरी मुलीच्या घरी एक प्रकारचा उत्सव असतो. पै-पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळींचा यावेळी गोतावळा जमा होतो. अशा आनंदाच्या आणि उत्सवाच्या प्रसंगावेळी जणू दुर्दैवाचे विरजन पडले. शुक्रवारी बोरगाववाडीच्या पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तवंदी घाटात झालेल्या अपघातात भाऊ बहिणीच्या लग्नाला मुकला.

वेळ सकाळी १० ची, लग्नासाठी स्तवनिधी मंगल कार्यालयात सुरू झालेली गडबड, पै-पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळींची वाढणारी गर्दी. त्यातच तवंदी घाटातील वळणावर भरधाव कंटेनरचा आणि कारचा भीषण अपघात झाला. आणि नवरदेवीच्या कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातला. या अपघातात कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. यात नवरदेवी मयुरीचा भाऊ महेश देवगोंडा पाटील (वय २३), काका आदगोंडा बाबू पाटील (वय ५५), काकू छाया आदगोंडा पाटील (वय ५५) व आजी चंपाताई मगदूम (वय ८०) यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर क्षणार्धात मंगल कार्यालयात आनंदाच्या उत्साहावर दुःखाचे विरजन पसरले. मंगल कार्यालयानजीक आल्यावर काळाने घाला घातला. या घटनेनंतर सर्वजणांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांचे डोळे पाणावले. मंगलमयप्रसंगी घडलेल्या घटनेने सर्वांनाच अश्रू अनावर झाले. सुखाच्या क्षणावेळी दुःखाने घेरल्याने पाटील कुटुंबीय दुःख सागरात बुडाले.

या घटनेनंतर नातेवाईक व पाहुण्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच गायब झाला. सदर अपघातामध्ये नवरी मयुरीचा भाऊ महेश देवगोंडा पाटील, चुलते आदगोंडा बाबू पाटील, चुलती छाया आदगोंडा पाटील व छाया यांच्या आई चंपाताई बाळेश्वर मगदूम (मुळगाव राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, सध्या रा. निपाणी) यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

गुरुवारी सायंकाळी हळदी कार्यक्रम झाला होता. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता अक्षता होत्या. तत्पूर्वीच पाटील कुटुंबावर काळाने घाला घातल्याने भाऊ बहिणीच्या लग्नाला मुकला. आदगोंडा पाटील यांचे कोडणी, नांगनूर, बुदिहाळ, जत्राट, एकसंबा, श्रीपेवाडी येथे पाहुणे असल्याने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेने निपाणीसह बोरगाववाडी व राशिवडे परिसरावर शोककळा पसरली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT