The Sun Temple of Pattankudi is a testament to religious grandeur
निपाणी : मधुकर पाटील
भारतातील तीन मंदिरांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या नजीकच्या पट्टणकुडी (ता. चिकोडी) येथील सूर्यदेव मंदिराची वार्षिक यात्रा आज रविवार, दि. २५ रोजी रथसप्तमी दिनी होत आहे. यानिमित्त मंदिर कमिटीने दिवसभरात श्री मूर्तीची पूजा, महाअभिषेक, मिरवणूक, महाप्रसाद, हळदी कुंकू, बोरस्नान आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील सूर्यमंदिर गावच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाची साक्ष बनून राहिले आहे.
निपाणी-चिकोडी मार्गावरील पट्टणकुडी येथे देशातील तीन मंदिरांपैकी एक सूर्यमंदिर आहे. सातव्या ते दहाव्या शतकादरम्यान दक्षिण भारतीय इतिहासामध्ये कुहुंडी-३००० नामक राजधानची केंद्र केंद्र म्हणून म्हणून प्रसिद्ध कुहुंडी-३ हजार खेडयांच्या केंद्रस्थानी हे नगर वास्तव्यास होते. तत्कालीन जैन धर्मीय राजवटीच्या खुणा, अवशेष आजही साक्ष आहेत. पट्टण याचा अर्थ नगर होय, जैन धर्म ग्रंथामध्ये कुष्मांची यक्षिणीचा उल्लेख आहे.
त्याच शब्दाचा अपभ्रंश म्हणजे कुहुंडी होय. हा शब्द पुढे कुडी म्हणून रुळत गेला. त्यावरुनच या गावाला पट्टणकुडी असे नाव पडले. हंपी कन्नड विश्वविद्यालयाचे उपकुलपती एम. एम. कुलबुर्गी यांनी येथे वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. दिल्ली विद्यापीठातील संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांनी येथे दिलेल्या भेटीत महत्त्वाचा ऐतिहासिक दुजोरा दिला आहे. या मंदिरापुढील सुंदर, नक्षीदार असा दंड गोलाकृती दगडी स्तंभ, त्यावरील सांकेतील चिन्हे, इतिहासाची साक्ष सांगतात.
मंदिरातील मूर्ती काळ्या, निळ्या शाळीग्राम दगडातून साकारल्या आहेत. सुमारे ३ फूट उंचीची ही मूर्ती द्विभुजाधारी तेजस्वी आहे. मूर्तीच्या दोन्ही भुजा या पद्मविभूषीत, अलंकृत आहेत. याशिवाय पायाजवळ उजवीकडे उपा ही उषःकालाची द्योतक असून डाव्या पायाजवळ असणारी संध्या ही संध्यारजनीची स्मृती दाखवते. सूर्यरथाचे सात घोडे हे वाहकाच्या रुपात कोरले आहेत.