बेळगाव : अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सोमवार, दि. 22 पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. शहर परिसरात विविध मंदिरांत दुर्गामाता मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, रविवारी आगमन सोहळ्यांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. अकरा दिवस घटस्थापना, ललिता पंचमी, सरस्वती आवाहन, महालक्ष्मी पूजन, महाआरती, दुर्गाष्टमी, पालखी उत्सव, गरबा-दांडिया, दसरोत्सव आदी विविध कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.
पहिल्या दिवशी दुर्गामाता मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने घटस्थापना करण्यात येणार आहे. घरोघरीही भक्तिमय वातावरणात घट बसविण्यात येणार आहेत. दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या कपिलेश्वर मंदिरात यंदाही भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. जत्तीमठ देवस्थान, अनंतशयन गल्ली येथील रेणुका मंदिर, जालगार गल्ली येथील कालिकादेवी मंदिर, भांदूर गल्ली येथील मरगाई आणि महालक्ष्मी मंदिर, चन्नमानगर येथील महालक्ष्मी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
शहापूर येथील अंबाबाई देवस्थानात सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातर्फे नऊ दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव, खासबाग येथील नामदेव शिंपी समाज व अंबाबाई देवस्थानच्यावतीने रोज सायंकाळी महाआरती होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. पाटील गल्ली येथील सिध्दनाथ जोगेश्वरी मंदिरात दसरा महोत्सवानिमित्त अभिषेक, कुंकूमार्चन, पुष्पपूजा, मिरवणूक होणार आहे.
नवरात्रोत्सव मंडळाकडून दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडप उभारले असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारपासून दुर्गामाता आगमन सोहळे सुरु झाले आहेत. रविवारीही विविध मंडळांच्या दुर्गामातेचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत झाले.
नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. रंगांच्या परंपरेमुळे एकोपा व समानतेचा संदेश देण्यात येतो. सोमवारी ( दि.22) पांढरा , मंगळवारी ( दि.23) लाल, बुधवारी ( दि. 24) निळा, गुरुवारी (दि.25) पिवळा, शुक्रवारी (दि.26) हिरवा, शनिवारी ( दि. 27) करडा, रविवारी ( दि. 28) नारंगी, सोमवारी (दि.29) मोरपंखी, मंगळवारी ( दि. 30) गुलाबी असे रंग आहेत.