बंगळूर : भाजप आणि निजद युतीला बंगळूर दक्षिण जिल्ह्यात दुसरा डी. के. शिवकुमार तयार करणे कधीही शक्य होणार नाही, असा गर्मित टोला कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि निजदच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कनकपुरा या गृह मतदारसंघाच्या दौऱ्यावर ते रविवारी (दि. ७) आले होते. येथे आयोजित 'कृतज्ञता मेळाव्यात' मतदारसंघातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. भाजप आणि निजदने ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी झालेली निवड ही जुन्या म्हैसूर भागात काँग्रेस पक्षासाठी अत्यंत फायदेशीर आणि बळ देणारी मानली जात आहे. या भागात पारंपरिकदृष्ट्या जमीनदार 'वक्कलिग' समाजाचे मोठे वर्चस्व आहे. मुख्यमंत्री शिवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कनकपुरात घेतलेली ही पहिलीच सभा आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायाभरणी मानली जात आहे.
जुन्या आठवर्णीना उजाळा देत मुख्यमंत्री म्हणाले, तुमचे मन तुम्हाला जे सांगतेय ते कदाचित इतरांना पटणार नाही. पण तुमची सदसद्विवेकबुद्धी याला नक्कीच संमती देईल. एक काळ असा होता जेव्हा पी. जी. आर. सिंधिया, विश्वनाथ, नारायण गौडा आणि यु. के. स्वामी या सर्वांनी माझ्याविरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, आज ते सर्व भूतकाळ विसरुन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे त्यांनी सांगितले.
२०२८ मध्ये इतिहास बदलण्याचा संकल्प
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत विचारले असता शिवकुमार यांनी दोन वर्षांच्या कालावधीचा थेट उल्लेख न करता आगामी २०२८ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. येत्या निवडणुकीत इतिहास बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.