Sambhaji Maharaj Chains
बेळगाव : छत्रपती संभाजी महाराजांची वीरता, शौर्य व बलिदानाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले साखळदंड मंगळवारी (दि. २०) बेळगावात काही काळासाठी आणण्यात आले होते. कपिलेश्वर मंदिरात ते दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दुपारी गर्दी झाली होती.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे तुळापूरमधून आणलेले साखळदंड बेळगावात दर्शनार्थ ठेवले होते. छत्रपती संभाजी महाराजांना कैद करताना वापरलेले साखळदंड प्रथमच बेळगावात येणार असल्याने शंभूप्रेमीमध्ये मोठी उत्सुकता होती. साखळदंडांचे मंदिर आवारात आगमन होताच छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. शंखनाद झाल्यानंतर फुलांनी सुशोभीत केलेल्या पाटावर साखळदंड मांडण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती. सभोवती दीप प्रज्वलित करून आरती म्हणण्यात आली. यानंतर शहर परिसरातील शिवशंभूप्रेमींनी साखळदंडांचे दर्शन घेतले.
कपिलेश्वर मंदिराचे सेवेकरी जोतिबा कावळे यांनी गोव्यात साखळदंडाचे दर्शन घेतल्यानंतर तुळापूरमधील प्रमुख कुमार शिवणे व ग्रामस्थांना तुळापूरकडे प्रस्थान होताना बेळगावात काही वेळ थांबण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन साखळदंड बेळगावात आणण्यात आले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहूल कुरणे, अभिजित चव्हाण, दौलत जाधव, प्रथमेश हावळे यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे शहर व ग्रामीण भागातील धारकरी तसेच मंदिराचे ट्रस्टी व सेवेकरी उपस्थित होते.