

बेळगाव : तालुक्यातील हिंडलगा, बेनकनहळ्ळी व हिरेबागेवाडी ग्राम पंचायतींचा दर्जा वाढविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे तिन्ही ठिकाणी नगर पंचायत अस्तित्वात येणार आहे. मात्र, नगर पंचायत झाल्यास ग्रामीण सुविधांपासून वंचित राहण्याची भीती ग्रामस्थांना भेडसावत आहे. त्यामुळे, या प्रस्तावाला विरोध होत आहे.
बेळगाव शहराजवळ हिंडलगा व बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत आहे. याठिकाणी प्रत्येकी 20 हजारहून अधिक लोकसंख्या आहे. शहरालगत असल्याने दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत. त्यातुलनेत सुविधा पुरविताना ग्राम पंचायतींना कसरत करावी लागत आहे. यामुळे नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्यास अधिक निधी मिळतो. त्याचबरोबर अधिक प्रमाणात विकासकामे करणे शक्य होते. परंतु, ग्रामस्थांना ग्रामीण सुविधांपासून वंचित राहावे लागते.
हिंडलगा ग्राम पंचायतीत 35, हिरेबागेवाडीत 32 तर बेनकनहळ्ळीत 36 सदस्य कार्यरत आहेत. बेनकनहळ्ळी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात सावगाव, बेनकनहळ्ळी, गणेशपूर आदींचा समावेश आहे. हिंडलगा ग्रा. पं. मध्ये हिंडलगासह विजयनगर, गोकुळनगर, डिफेन्स कॉलनी, लक्ष्मीनगर, पाईपलाईन रोड, सिंडिकेट कॉलनी आदी भागांचा समावेश आहे. हिरेबागेवाडीमध्ये सिद्धण्णभावी, कल्लारकोप्प गावांचा समावेश आहे. हिंडलगा वगळता बेनकनहळ्ळी, हिरेबागेवाडी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात शेतकर्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. हा भाग ग्रामीण आहे. परिणामी ग्रामीण जनतेला मिळणार्या सुविधांची याठिकाणी आवश्यकता आहे.
हिंडलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. हिंडलगा वगळता अन्य भागात शेतकरी कुटुंबांची संख्या कमी आहे. काही भाग मनपाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केला आहे. परिणामी बेळगाव शहराशी संबंध अधिक आहे. नगर पंचायत झाल्यास प्रामुख्याने रोजगार हमी योजनेतील कामे बंद होणार आहेत. घरपट्टी, पाणीपट्टीत वाढ होणार आहे. याचा फटका ग्रामस्थांना अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.
रस्ते, पाणी, वीज सुविधा मिळणार
केंद्र, राज्य सरकारकडून अधिक अनुदान
रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांची व्यवस्था
व्यापार, उद्योग वाढीस अनुकूल धोरण
पिण्याचे पाणी, घरपट्टी, करांत दुप्पट वाढ
रोजगार हमी योजनेपासून गरजू वंचित
ग्रामीण भागाला मिळणार्या सवलती बंद
सरकारी सवलतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची सक्ती