बेळगाव : दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय रविवारी (दि. 17) सायंकाळी चौथ्यांदा तुडुंब भरले. जलाशयाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होऊन ती 2,476 फुटांवर पोचली. त्यामुळे, दोन दरवाजे सात इंचाने उघडून मार्कंडेय नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदा राकसकोप जलाशय चारवेळा तुडुंब झाले आहे.
रविवारी सायंकाळी जलाशय तुडुंब झाल्याने दोन आणि पाच क्रमांकाचा दरवाजा उघडून सात इंचाने विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या पावसाची संततधार कायम असून आणखी जोर वाढला तर इतर दरवाजेही उघडण्याची वेळ पाणीपुरवठा मंडळावर येणार आहे. गेल्यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जलाशय तुडुंब झाले होते. त्यावेळी, तीन दरवाजे 10 इंचाने उघडण्यात आले होते. सध्या विसर्ग पुन्हा सुरु झाल्याने मार्कंडेय नदीला पूर येण्याची शक्यता असून शेतकर्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाने पत्रकाद्वारे केले आहे.
गतवर्षीच्या याच दिवशी जलाशयाची पाणीपातळी 2,455.80 फूट होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 22 फूट पाणीसाठा अधिक आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 2,475 इतकी पाणी पातळी आवश्यक आहे. यंदा गेले कित्येक दिवस पाणीपातळी 2,474 ते 2,475 फूट अशीच टिकून आहे. त्यामुळे, महिनाभरापासून दोन दरवाजे चार ते पाच इंचाने उघडून विसर्ग सुरुच आहे.
राकसकोप जलाशयातून रविवारी सायंकाळपासून मार्कंडेय नदीत विसर्ग सुरु झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. पाणी पात्राबाहेर पडून शिवारांत शिरले आहे. हिंडलगा पंपिंग स्टेशन पाण्याखाली जाऊ नये यासाठी एलअँडटी कंपनीचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.