बेळगाव : कारभार सुरळीत न चालवल्यामुळे जिल्ह्यातील 12 प्राथमिक कृषी पतसंस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकर्यांना फटका बसणार आहे. राज्यभरातील एकूण 125 प्राथमिक कृषी पतसंस्था अवसायनात (लिक्विडेशन) काढण्यात येणार आहेत.
शेतकर्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळावा, खते, बियाणे, कीटकनाशकांचे वाटप करणे सुलभ ठरावे, सवलतीच्या दरात सुलभपणे कर्जपुरवठा करण्यात यावा, यासाठी प्रत्येक गावात प्राथमिक कृषी पतसंस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. गाव तेथे कृषी पतसंस्था असे सरकारचे धोरण आहे. त्यांचे नियोजन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. अर्थपुरवठा केला जातो. कृषी खात्याकडून खते, बियाणे, कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो. विक्री व वितरण गावपातळीवर प्राथमिक कृषी पत संस्थांकडून केले जाते. परंतु, सहकारी संस्थांच्या कामकामाजात अनेक कारणांमुळे अनियमितता येते. संचालक मंडळांकडून योग्य प्रकारे संस्था चालविण्यात येत नाहीत. यातून संस्था अडचणीत येतात. याच कारणामुळे बेळगाव जिल्ह्यातील 12 कृषी पतसंस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
मागील आठवड्यात लोकसभा कामकाजावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रश्नोत्तर काळात राज्यातील प्राथमिक कृषी पतसंस्थांची माहिती दिली. यामध्ये राज्यातील 125 संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. तर 64 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे कामकाज ठप्प झाल्याची माहिती दिली. राज्यात एकूण 6291 प्राथमिक कृषी संस्था आहेत. राज्यात चिक्कबळापूर जिल्ह्यात सर्वाधिक 28 संस्था अवसायनात निघणार आहेत. त्यापाठोपाठ हासन जिल्ह्यातील 13, बेळगाव जिल्ह्यातील 12 प्राथमिक कृषी पतसंस्थांचा समावेश आहे.
देशात सहकार क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक पसरले आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ाहे. कर्नाटक सहकार क्षेत्रात देशात तिसर्या क्रमांकावर आहे. बेळगाव जिल्ह्यात सहकाराचे जाळे फार मोठे आहे. याचा फायदा गरजूंना झाला आहे. राज्यात सर्वाधिक सहकारी संस्था बेळगाव जिल्ह्यातच कार्यरत आहेत. यामध्ये बेळगाव, चिकोडी, सौंदत्ती, हारुगेरी, गोकाक तालुक्यातील संस्थांचा समावेश आहे. मात्र कर्नाटकात चिक्कबळ्ळापूर, हासन आणि बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक कृषी पतसंस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
होनगा प्राथमिक कृषी पतसंस्था
श्रीमाता लक्ष्मी प्राथमिक कृषी पतसंस्था, उचगाव
श्री चव्हाटा प्राथमिक कृषी पतसंस्था, कुद्रेमानी
जय गोमटेश प्राथमिक कृषी पतसंस्था बोरगाव
प्राथमिक कृषी पतसंस्था, कारदगा
प्राथमिक कृषी पतसंस्था, लोंढा
प्राथमिक कृषी पतसंस्था अडीबट्टी, गोकाक
प्राथमिक कृषी पतसंस्था पांडेगाव
प्राथमिक कृषी पतसंस्था शिंदोगी, सौंदत्ती
प्रियांका प्राथमिक कृषी पतसंस्था, सुटट्टी
श्री अंबा भवानी प्राथमिक कृषी पतसंस्था हारुगेरी
श्री महंत महाराज प्राथमिक कृषी पतसंस्था सौंदत्ती