MLA Ganesh Hukkeri Prakash Hukkeri Chikodi
काशिनाथ सुळकुडे
चिकोडी : कर्नाटकातील राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात डावलले गेलेल्या हुकेरी पिता-पुत्रांना या विस्तारात स्थान मिळेल, अशी दाट आशा त्यांच्या समर्थकांना होती.
मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही हुकेरी कुटुंबाला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. मागील ४० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी आणि त्यांचे पुत्र आमदार गणेश हुक्केरी यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
उत्तर कर्नाटकातील चिकोडी भागामध्ये काँग्रेस पक्षाची ओळख म्हणजे 'हुक्केरी घराणे'.
दीर्घ राजकीय प्रवास: विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी ग्रामपंचायत अध्यक्षापासून ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार आणि कर्नाटक सरकारमध्ये साखर व लघुउद्योग मंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात प्रचंड 'मोदी लाट' असताना, काँग्रेस हायकमांडच्या सूचनेचा आदर करत प्रकाश हुक्केरी यांनी चिकोडी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी विजय मिळवला. पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी त्यावेळी मंत्रिपदाचा त्याग केला होता.
वडील लोकसभेवर गेल्यानंतर चिकोडी-सदलगा मतदारसंघातून आमदार गणेश हुक्केरी सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी कर्नाटकाचे मुख्य प्रतोद (Chief Whip) म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
२०१९ मध्ये जेव्हा कर्नाटकात काँग्रेसच्या ११ आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा आमदार गणेश हुक्केरी यांनाही भाजप : भाजप प्रवेशाची आणि मंत्रिपदाची मोठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, हुक्केरी पिता-पुत्रांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी न करता ती ऑफर धुडकावून लावली आणि निष्ठा जपली.
"मागील ४० वर्षे ज्यांनी पक्षासाठी घाम गाळला, मोदी लाटेतही काँग्रेसचा झेंडा फडकवला आणि संकटाच्या वेळी पक्षाची साथ सोडली नाही; त्यांना डावलून अलीकडेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या लक्ष्मण सवदींसारख्या नवख्या नेत्यांना मंत्रिपद दिले जाते? निष्ठावंतांना अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे?"
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे हुक्केरी समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता हुक्केरी पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) या पिता-पुत्रांना आपल्या गोटात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
जर हुक्केरी पिता-पुत्रांनी पक्षाला 'जय कर्नाटक केला, तर बेळगाव आणि विशेषतः चिकोडी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या सर्व घडामोडींवर प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कर्नाटकच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.