

बंगळूर : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडला आहे. मंत्रिपदाची यादी अंतिम करण्यास पक्षश्रेष्ठींना वेळ मिळत नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मंत्रिमंडळाच्या यादीला मंजुरी मिळविण्यासाठी सोमवारपासून दिल्लीत तळ ठोकून बसलेले मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत.
गुरुवारी मंत्रिमंडळ शपथविधीची तयारी करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी लोकसभेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने मंत्रिमंडळ विस्तारावार शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. बुधवारी सायंकाळी होणारी शिवकुमार-राहुल बैठकही झाली नाही. विस्ताराचे नंतर पाहू, असा संदेश राहुल यांनी शिवकुमार आणि काँग्रेसच्या आमदारांना दिला आहे. परिणामी, काही आमदार दिल्लीहून परतले आहेत, तर शिवकुमार परतण्याच्या तयारीत आहेत.
राज्याचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार वेगवेगळ्या कारणाने लांबणीवर पडत चालला आहे. यामुळे मंत्रिपदावर डोळा ठेवून कार्यरत असलेल्या इच्छुक आमदारांच्या पदरी निराशा पडली आहे. मुख्यमंत्री शिवकुमार हे मंत्रिपदाच्या यादीला पक्षश्रेष्ठीकडून मंजुरी मिळविण्यासाठी दीड महिन्यापासून कसरत करत आहेत.
शिवकुमार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी गुरुवारचा दिवस निश्चित केला होता. त्यानुसार त्यांनी सोमवारीच दिल्ली गाठली होती. त्यांनी पक्षाचे राज्य प्रभारी रणजीतसिंग सूरजेवाला यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.२९) सायंकाळी राहुल गांधी यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, राहुल गांधी सध्या लोकसभेच्या अधिवेशनात गुंतले आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. यामुळे नियोजित बैठक होणार नसून मुख्यमंत्री शिवकुमार यांना बंगळूरला माघारी जाण्यास सांगितले. मुख्यमंत्री शिवकुमार यांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना माहिती दिली होती.