Karnataka Cabinet Expansion | आज होणार विस्तार; नावे अद्याप गुलदस्त्यातच

वेणुगोपाल बंगळुरात पोहोचल्यानंतरच चित्र होणार स्पष्ट
Karnataka Cabinet Expansion
Karnataka Cabinet Expansion
Published on
Updated on

बंगळूर : गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी (दि. ३) दुपारी ४.०५ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र, अद्याप नूतन मंत्र्यांची नावे गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांच्या नावांना अंतिम स्वरूप देण्यासाठी एआयसीसी संघटन सचिव वेणुगोपाल रविवारी (दि. २) रात्री वा सोमवारी बंगळूरला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदार शशिकांत सेंथिल यांना राज्यातील नेते व हायकमांडने तयार केलेल्या यादीच्या आधारे संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. यावेळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हायकमांडच्या पथकाने सर्व बाजूंनी पडताळणी करून गुणवत्ता, संघटनात्मक क्षमता, कार्यक्षमता व विभागीय व्यवस्थापन क्षमतेच्या आधारावर त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जावे. पक्षाशी एकनिष्ठ, नेतृत्वाच्या विरोधात न बोलणाऱ्या तसेच विशेषतः मूळ काँग्रेसजनांना मंत्रिमंडळात स्थान दिले जावे, असे सुचविले आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेल्या यादीवरही चर्चा सुरू आहे. केवळ मूळ काँग्रेसजनांचाच विचार केला गेला, तर अनेकजण संधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मात्र, खासदार सेंथिल यांच्या पथकाने थेट संभाव्य मंत्र्यांशी संपर्क साधून यावर चर्चा केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य जमीर अहमदखान यांच्याऐवजी शिवाजीनगरचे आमदार रिझवान अर्शद यांचा विचार करावा, असा मतप्रवाह आहे. याउलट एका गटाने म्हैसूरचे तन्वीर सेठ यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. तसेच, इडीग समाजातील नेते मधू बंगारप्पा यांच्याऐवजी गोपाळकृष्ण बेलुरू यांना मंत्री बनवण्याच्या बाजूने असले, तरी काहींनी विजयनगर जिल्ह्यातील एच. आर. गवियप्पा यांच्या नावाची शिफारस केली आहे.

गोंधळ कायम : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनुसूचित जातीचे प्रतिनिधीत्व करणारे नरेंद्र स्वामी यांना मंत्री करावे, असे सुचविले आहे. तर मुख्यमंत्री शिवकुमार यांनी अनेकलचे आमदार बी. शिवण्णा यांचे नाव पुढे केले आहे. मात्र, एका गटाने या दोघांऐवजी धारवाडचे प्रसाद अबय्या यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे एकूणच मंत्रिमंडळ विस्तारावरून गोंधळ कायम आहे. या गोंधळावर सोमवारी पडदा पडणार आहे. तूर्तास नूतन मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार यावर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

होरट्टी यांचा राजीनामा

विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी रविवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानपरिषदेत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे विधान परिषद आमदार असलेल्या बसवराज होरट्टी यांना हटवून त्या ठिकाणी एखाद्या काँग्रेस नेत्याची निवड करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मात्र, ही नामुष्की टाळण्यासाठी होरट्टी यांनी राजीनामा दिला. ७५ आमदार असलेल्या विधानपरिषदेत जूनपर्यंत काँग्रेसचे ३५ आमदार होते. १८ जून रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४ आमदार निवडून आल्यानंतर हे संख्याबळ ३९ म्हणजे ७५ या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिकवर पोहोचले. त्यानंतर सभापतिपद बदलण्याचा निर्धार काँग्रेसने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news