Nipani Helmet Awareness Campaign
निपाणी : निपाणी शहर पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) सकाळी केवळ दोन तासात येथील धर्मवीर संभाजी चौक येथे थांबून नियमाचे उल्लघंन करणाऱ्या दुचाकीस्वारांना रोखून धरीत त्यांच्या डोक्यावर हेल्मेट परिधान केले. यावेळी सुमारे ५०० जणांना स्वतः शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी सीपीआय बी. एस. तळवार यांच्या उपस्थितीत ‘एक तर हेल्मेट खरेदी करा, नाहीतर दंड भरा’असे मार्गदर्शन सुचना करीत दुचाकीस्वारांमध्ये अपघात घडून नये याबाबत जनजागृती केली.यावेळी अनेक दुचाकीस्वारांनी साहेब, माझे हेल्मेट घरी आहे सांगण्याची विनवणी केली. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी कोणतीही बाब न ऐकता दोन पर्याय ठेवल्याने अशा दुचाकीस्वारांची मोठी गोची झाली.
गेल्या अनेक दिवसापासून राज्यासह बेळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने हेल्मेट वापराबाबत वारंवार जनजागृती करूनही अनेक दुचाकीस्वारांकडून याचा वापर टाळला जात आहे त्यामुळे साहजिकच दुचाकीच्या अपघातात वाढ होत चालली आहे. त्यामुळे या बाबी हेरून सध्या सर्वच पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.
यामध्ये चारचाकी वाहनधारकांकडून सीट बेल्टचा वापर होतो की नाही?, वाहनांची कागदपत्रे अपडेट आहेत की नाहीत?, वाहन चालवण्याचा परवाना आहे की नाही? या बाबी तपासल्या जात आहेत. यामध्ये विशेष करून अपघाती घटना घडू नयेत यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराबाबत वारंवार सूचना केल्या जातात. मात्र आजही या सर्व बाबीकडे वाहनधारकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बऱ्याच वेळा अनेक वाहनधारकांकडून राजकीय तसेच सामाजिक व इतर बाबतीत वशिलेबाजी करून तात्पुरती आपली दंडातून सुटका केली जाते. मात्र हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे कम प्राप्त असल्याचे असल्याची माहिती यावेळी शहराचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी बसस्थानकाबाहेरील धर्मवीर संभाजी चौक येथे दोन तास थांबून दुचाकीस्वारांना रोखून धरीत शहर पोलीस प्रशासनाने त्यांची कसून चौकशी केली. यावेळी अनेकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या बाबी उघडकीस आल्या. यात अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घरात तसेच प्रसंगी दुचाकीला अडकून तसाच सुसाट प्रवास करण्याचा बेत आखल्याचे दिसून आले.
अशा दुचाकीस्वारांना कारवाई दरम्यान थांबलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र वाहतुकीचे नियम काय असतात, आपला जीव लाखमोलाचा आहे, हेल्मेट परिधान करा, या सर्व बाबी समजून सांगून चांगल्या किमतीचे हेल्मेट ५०० रुपयाला खरेदी करण्यास भाग पाडले. ज्यांनी हेल्मेट खरेदी करण्यास नकार दिला. अशांकडून ५०० ते नियमात राहून १००० रू. पर्यंतची दंड आकारला. यादरम्यान धर्मवीर संभाजी चौक परिसरात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, निपाणी शहरात पोलिसांकडून हेल्मेट बाबत कारवाई सुरू असल्याचे सोशल मीडियासह एकमेकाद्वारे कळताच अनेकांनी शहरात न येताच पर्याय मार्गाने आवश्यक ती कामाची ठिकाणे गाठली.
अनेक दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नाही. या बाबी प्रकर्षाने जाणवत आहेत.यामध्ये अनेक दुचाकीस्वार हेल्मेट असूनही ते परिधान करीत नाहीत. शिवाय आपल्या वाहनांची कागदपत्रे अपडेट ठेवत नाहीत. मी बाब चुकीची असून प्रशासनानेही अनेकवेळा या बाबी समजून सांगूनही त्याचे पालन होत नसल्याने आता पोलीस प्रशासनाने ‘एक तर हेल्मेट खरेदी करा, नाहीतर दंड भरा’हा उपक्रम राबवला आहे. यापुढील काळातही हा उपक्रम सुरूच राहणार आहे.