

नांदेड : वारंवार सूचना देऊनही वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने पोलिस अट्टल गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्ध व हद्दपारीची कारवाई करण्यासंदर्भात ॲक्शनमोडवर आले असून गेल्या १० महिन्यांत १०० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. आज ग्रामीण पोलिसांनी विवेक विद्यासागर गजभारे यांच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गूरव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर देण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही काही गुन्हेगारांच्या वर्तणुकीमध्ये बदल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई केली जात आहे. ज्या गुन्हेगारांवर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अशांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. त्या प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हद्दपार करणे, स्थानबद्ध करणे यासारख्या कारवाया करताना आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याने गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही समाजकंटकांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली पण काही आरोपींकडून मात्र गुन्हयांची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षभरात नांदेड पोलिसांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपार, स्थानबद्धतेची कारवाई केली असून त्याला जिल्हा प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पूर्वी पोलिसांकडून गेलेल्या प्रस्तावांवर जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाई करण्यासाठी मोठा वेळ लागत होता. पण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी करत तत्काळ निर्णय घेण्याचा नवा चांगला पायंडा पाडला आहे. जिल्हा व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून होत असलेल्या या कारवाईन आरोपींचे मात्र चांगले धाबे दणाणले आहेत. गेल्या आठवड्यात ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वसरणीतील सराईत गुन्हेगार विवेक विद्यासागर गजभारे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस अधिक्षक कार्यालयाने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर आज त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. गजभारे याच्याविरुद्ध अवैध शख बाळगणे, जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्रित केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस प्रशासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसोबतच प्रतिबंधात्मक कारवाईची जोड देण्यात आली आहे. आपापल्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शोधा त्यांचे सध्याचे वास्तव्य, त्यांचे साथीदार व उदरनिर्वाहाचे साधने तपासण्यासंदर्भात गुन्हे शाखेच्या पथकाला विशेष सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे काही प्रमाणात रस्त्यावरील लुटमारीच्या घटनांत काहीशी घट झाली आहे.
अलीकडच्या काळात वेगवेगळ्या गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अत्यंत कमी वयात मुले गुन्हेगारीकडे वळल्याने पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन मुलांना गुन्हेगारीपासून कसे दूर ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून थांबवताना त्यांना कोणाचे बळ मिळत आहे. याचा शोध घेतला जात आहे. भविष्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असू नये, यासाठी पालकांचेही समुपदेशन केले जात आहे.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवताना संघटितपणे गुन्हे करणाऱ्यांविरुद्धही आता मकोकासारख्या कारवाया केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा चांगला फायदा होत आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस असलेल्या भागात अमली पदार्थांची विक्री खूप मोठी समस्या आहे. पोलिस प्रशासन औषध विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करीत असले तरीही अनेकजण छुप्या पद्धतीने अमली पदार्थाची विक्री करतात याबाबत स्वतः खा. रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली होती. आता याकडेही पोलिसांनी आपले लक्ष केंद्रीत केली आहे.