बेळगाव: रस्त्याशेजारी असलेले एटीएम चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मात्र, एटीएम फोडून त्यातील रक्कम काढता आल्याने सुमारे 200 मीटरवर नेऊन चोरट्यांनी ते एटीएम झाडीत फेकून दिले. त्यामध्ये 1 लाख 10 हजारांची रक्कम असल्याची माहिती एटीएम व्यवस्थापनाने दिली आहे. काकतीजवळील न्यू वंटमुरी येथे मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला.
अधिक माहिती अशी, इंडिया वन या एजन्सीने न्यू वंटमुरी येथे राष्ट्रीय महामार्गालगत एटीएम बसवले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिघा बुरखाधारी चोरट्यांनी जागेवरच आधी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यश आले नसल्याने एटीएम उखडून काढले आणि काही अंतरावर नेऊन गॅस कटर व अन्य हत्यारांचा वापर करत ते फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही.
त्यामुळे एका पडक्या विहिरीजवळ झाडीत यंत्र टाकून ते फरारी झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, हे एटीएम बँकेचे नव्हे, तर इंडिया वन या एजन्सीचे होते. महामार्गाचे रूंदीकरण सुरू असल्याने एटीएममध्ये जाणार्या पायर्या रस्ता करताना गेल्या आहेत. त्यामुळे हे एटीएम हलवण्यात येणार होतेच. कंपनीने आपले दुसरे एटीएम गावात सुरू केले आहे.
पुढील आठ-दहा दिवसांत हे एटीएम हलवण्याआधीच चोरट्यांनी ते पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पायर्या नसल्याने बँक ग्राहकांना एटीएममध्ये जाता येत नाही. तरीही यामध्ये रक्कम का ठेवली, शिवाय हे एटीएम वरच्यावर ठेवलेले असल्याने चोरट्यांना नेणे सोपे झाले. ते फोडता न आल्याने रक्कम गेली नसली तरी एटीएम बसवताना रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही नियमाचे पालन केलेले दिसतनाही. त्यामुळे एजन्सीची सखोल चौकशी करण्याची सूचना आपण अधिकार्यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अलार्म व्यवस्था महत्वाची : पोलीस आयुक्त
एटीएमला अलार्म होता परंतु, तोदेखील बंद केला होता. जर येथे रक्कम घातली असेल तर अलार्म का बंद केला, हा प्रश्न आहे. जर कोणत्याही एटीएमला अलार्म जोडला असेल व एटीएमशी छेडछाड झाली तर लगेच अलार्म वाजतो. त्यामुळे प्रत्येक बँक व्यवस्थापनाने एटीएमला अलार्म जोडणे गरजेचे आहे. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या मार्गसूचीचे बहुतांशी बँका पालन करत नाहीत.