ऊस उत्पादनवाढीसाठी नवीन तंत्रज्ञान File Photo
बेळगाव

ऊस उत्पादनवाढीसाठी नवीन तंत्रज्ञान

बेळगावसह पाच जिल्ह्यांत प्रायोगिक उपक्रम : तीन हजार हेक्टर क्षेत्रात प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

New technologies for increasing sugarcane production

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पहिल्यांदाच माती, पाणी, पोषक घटक यांचा समतोल राखत ऊस उत्पादन आणि उतारा वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बेळगावसह बागलकोट, विजयपूर, गुलबर्गा आणि मंड्या या पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविण्यात येणार आहे. एकूण तीन हजार हेक्टर क्षेत्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

ऊस उत्पादक शेतकरी उतारा आणि उत्पादनवाढीसाठी भरमसाठ प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशके, औषधांची फवारणी करतात. अधिक प्रमाणात पाण्याचा वापर करतात. यातून शेतजमिनीचा पोत बिघडतो. अपेक्षित उत्पादन आणि उतारा मिळत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. अयोग्य पद्धतीने पिकांचे संगोपन करण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे राज्य सरकार आणि राज्यातील साखर कारखाने यांच्या सहकार्यातून बेळगाव, बागलकोट, विजयपूर, गुलबर्गा, मंड्या जिल्ह्यात समग्र माती, पाणी, खते आणि समतोल पोषक घटक जपणूक अशी योजना तयार केली आहे.

बेळगाव जिल्ह्यात २९, बागलकोट जिल्ह्यात १३, विजयपूर १०, गुलबर्गा ४, मंड्या ५ याप्रकारे एकूण ६१ साखर कारखाने कार्यरत आहेत. प्रत्येक कारखान्याकडे ३५ ते ४० हेक्टर जमिनीची जबाबदारी देण्यात आली आहे. योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, ठिबक सिंचन, उसाच्या पाचटाचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रांची खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्याचा विस्तार राज्यभर करण्यात येणार आहे. कृषी खात्याच्या सहकार्याने उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच साखर कारखान्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २०) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे. पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे.
- एच. डी. कोळेकर, सहसंचालक, कृषी खाते, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT