

Gandhinagar-Dharmveer Sambhaji Chowk flyover: 275 crore
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय महामार्गापासून अशोक सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल आणि राणी चन्नम्मा सर्कलमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकाला जोडणाऱ्या उड्डाणपूल बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी २७५.५३ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रहदारीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी २.०३ कि.मी. लांबीचा हा पूल असणार असून हा प्रकल्प पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेण्यात येत आहे.
हुबळीस्थित व्हीएलएस कन्सल्टंटस्ने यापूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार, प्रस्तावित उड्डाणपूल संकम हॉटेलपासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत सुमारे ३.६ कि.मी. लांब आहे. जोडणाऱ्या मार्गांसह संपूर्ण कॉरिडॉर सुमारे ४.५ कि. मी. लांबीचा असून, तो अशोक सर्कल आणि आरटीओ चौकामार्गे चन्नम्मा चौकाला जोडतो.
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या २.०३ कि. मी. लांबीमध्ये आणि पूर्वीच्या डीपीआरमधील फरक प्रकल्पाच्या सविस्तर अंमलबजावणी आणि निविदा प्रक्रियेच्या टप्प्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.