

Did Yediyurappa even remain Chief Minister for 5 years?
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांपासून शारीरिक शक्तिहीनता जाणवत असली, तरी राजकारणात मी कधीच शक्तिहीन नव्हतो. यापुढेही असणार नाही. हायकमांड माझ्यासोबत आहे. त्यामुळे पाचही वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार असून २०२८ मध्येही आमचेच सरकार सत्तेवर असणार आहे, असा दावा सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री विधानसभेत केला. येडियुराप्पा आपणच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार म्हणून सांगत होते, मग ते का राहिले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
सुवर्णसौध येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाचे शुक्रवारी (दि. १९) सूप वाजले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत उत्तर कर्नाटकावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्रिपदावरून विरोधी पक्षाने त्यांना वारंवार छेडले. विरोधी गटनेते आर. अशोक, बसनगौडा पाटील-यत्नाळ, सुनील कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, मी कधीच राजकीयदृष्ट्या कमकुवत झालो नाही. लोकशाहीत मतदार स्वतःच राजकीय शक्ती ठरवत असतात. जनता माझ्यासोबत आहे.
२०२३ मध्ये हायकमांडसमोर कोणताही करार झाला नाही. त्यांनी मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. माझ्यात आणि उपमुख्यमंत्र्यांत अडीच वर्षांचा कोणताही करार झाला नाही. आमचा पक्ष हायकमांडचा पक्ष आहे. हायकमांडने मला पाच वर्षे दिली आहेत. त्यामुळे पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विरोधी पक्षाने सातत्याने छेडण्याचा प्रयत्न केला. पण, सिद्धरामय्या यांनी आज आत्मविश्वासपूर्वक मीच मुख्यमंत्री असणार असे सांगितले. पण, विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे उपस्थित नव्हते. त्यांचे समर्थकही शांतपणे ऐकत होते.
सिद्धंचा सवाल, पाटलांचा टोला
सभागृहात भाजप आमदार मुनिरत्न यांनी तुम्ही जसे शड्डू ठोकून मीच असणार असे, सांगत होता, तसे का सांगत नाही, असा सवाल केला. तर विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि सुनीलकुमार यांनीही तुमची भाषा सारखी बदलतेय, असा टोला लावला. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येडियराप्पा आपणच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार म्हणून सांगत होते, मग ते का राहिले नाहीत, असा सवालही केला. आमदार बसनगौडा पाटील यांनी, भाजपकडे अध्यक्ष कोण हे समजत नाही, ते मुख्यमंत्री कोण याची काय चर्चा करताहेत, असा टोला लावला.