NEET Scam News
'नीट' प्रकरणी बेळगावातील घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक करण्यात आली 
बेळगाव

बेळगावातील घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : नीटमध्ये कमी गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी कोट्यातून एमबीबीएस प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बेळगावातील दहाजणांना 1 कोटी 30 लाख रुपयांना गंडा घालून फरारी झालेल्या भामट्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. अरगुंड अरविंद ऊर्फ अरुणकुमार अरगुंड प्रकाशम (वय 47, रा. तेलगंणा) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून बारा लाखांची रोकड, संगणक व इतर साहित्य मिळून एकूण 12 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवारी (15 जुलै) मार्केट पोलिस स्थानकात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि कारवाई संदर्भात पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, अरविंदने कोल्हापूर सर्कल येथे नीट काऊन्सेलिंग सेंटर सुरू केले होते. बारावी झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व नीट देणार्‍या विद्यार्थ्यांचा डाटा मिळवून अरविंद त्यांच्याशी फोन, फेसबुक, इंन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत होता. समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करून नीट परीक्षेत कमी गुण मिळाले, तरी आपल्या ओळखीवर तुम्हाला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात सरकारी कोट्यातून एमबीबीएस सीट मिळवून देतो, असे सांगून प्रत्येकी 13 लाख 75 हजार रुपये घेत होता. अशा प्रकारे त्याने दहा जणांकडून 1 कोटी 30 लाख रुपये उकळले होते. त्यानंंतर कोल्हापूर सर्कल येथील कार्यालय बंद करुन फरारी झाला.

पैसे भरलेल्या संबधितांनी अरविंदशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क होऊ न शकला नाही त्यानंतर अस्माबेगम मोहम्मदतजमुल अहेद (रा.मिर्जापुर जि.बिदर) या महिलेने 18 नोंव्हेर 2023 रोजी मार्केट पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसानी गुन्हा दाखल करुन घेऊन भामट्याला अटक करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. पण, अरविंद बेळगावात ज्या ठिकाणी वास्तव्यास होता, त्याठिकाणी त्याने दिलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रे बनावट होती. तो वापरत असलेले मोबाईल सीम कार्डही दुसर्‍याच्या नावे होते. इतकेच नव्हे तर प्रत्येकवेळी दुसर्‍याच्या नावावरील सीमचा वापर करुन तो ते फेकून देत होता. अशा पध्दतीने अरविंद पोलिसाना चकवा देत होता. गेल्या सहा माहिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसाना त्याच्या कारचालकाचा नंबर मिळाला. तांत्रिक विभागाच्या मदतीने त्या नंबरच्या शोधार्थ पोलिस पथक मुंबईला रवाना झाले. त्याठिकाणी अद्वय विद्या प्रवेश मार्गदर्शन प्रा.लि नावाने नवीन कार्यालय थाटण्याच्या तयारीत असताना पोलिसानी अरविंदला ताब्यात घेतले.

अरविंदने विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे आपल्या व्यवस्थापकाच्या बँक खात्यात ठेवले होते. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. उर्वरित पैशांचे सोने खरेदी करुन ते विविध फायनान्स कंपन्यांमध्ये ठेवले आहे. तेदेखील लवकरच जप्त करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त जगदीश यानी सांगितले. कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसानी पारितोषिक देऊन गैरविले जाणार आहे. संशयिताला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.

दै.‘पुढारी’कडून आधीच पर्दाफाश

बेळगाव पोलिसांनी गेले सहा महिने अरविंदचा शोध चालवला होता. त्यासाठी मुंबईच्या अनेक वार्‍या केल्या होत्या. त्याचा माग लागल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस सक्रिय झाले. त्याचवेळी म्हणजे गेल्या 5 जुलै रोजी ‘पुढारी’ने बेळगावात घडलेल्या या नीट प्रवेश घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. एका उच्चशिक्षित युवकाने ट्यूशन केंद्र सुरू करून पालकांची एक ते सव्वा कोटीची फसवणूक केल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने 5 जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. त्यावर सोमवारी 15 जुलै रोजी पोलिसांचे शिक्कामोर्तब झाले.

SCROLL FOR NEXT