बेळगाव : जप्त केलेल्या वाळू वापराचा आदेश देण्यासाठी लाच मागणारा खाण व भूगर्भ खात्याचा अधिकारी गुरुवारी (दि. 28) लोकायुक्त जाळ्यात सापडला. फैयाज अहंमद शेख (वय 52, रा. शिवबसवनगर, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत लोकायुक्त पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणातील फिर्याददार शीतल गोपाळ सनदी (रा. हुळीकट्टी गल्ली, अथणी) यांच्या संपर्कातील बी. के. मगदूम नामक रस्ते कंत्राटदार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने बेकायदेशीर वाळू जप्त करून ती ऐगळी येथे साठवली होती.
ही वाळू ऐनापूर येथे सिमेंट रस्ता कामासाठी जप्त केलेली वाळू मगदूम यांना हवी होती. यासाठी सनदी यांनी खाण व भूगर्भ खात्याकडे रितसर परवानगी मागितली होती. परंतु, ही वाळू नेण्यासाठी परवानगी देण्यासाठी उपरोक्त अधिकार्याकडून 50 हजारांची लाच मागितली जात होती. यावर तोडगा निघून 15 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. हा व्यवहार जरी अथणी तालुक्यातील असला तरी बेळगावमधील कार्यालयात ही रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी सनदी हे रक्कम देण्यासाठी आले असता लोकायुक्त पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. लोकायुक्त उपअधीक्षक भरत रेड्डी, उपअधीक्षक बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. एच. होसमनी व त्यांच्या सहकार्यांनी हा छापा टाकला.