Trump app
कर्नाटकातून फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे गेल्या ५ ते ६ महिन्यांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा वापर करत सामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. ट्रम्प यांच्या AI -जरटेडेट व्हिडिओ आणि फोटोंचा वापर करत एका ॲपवरून एकूण जवळपास २ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार कर्नाटकातील २०० हून अधिक गुंतवणूकदारांनी सायबर पोलिसांकडे केली आहे.
अज्ञातांनी 'ट्रम्प हॉटेल रेंटल' या अॅपद्वारे लोकांची फसवणूक केली आहे. हे ॲप आता बंद आहे. त्यांनी लोकांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी काहींना १०० टक्केपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या घोटाळ्यात ८०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. काहींनी तर जलद परताव्याच्या आशेपोटी १० लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली.
हावेरीचे पोलीस अधीक्षक अंशुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी ट्रम्प ॲप नावाने एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवले. हे ॲप ट्रम्प हॉटेल रेंटल आणि गुंतवणूक प्लॅटफॉर्मशी जोडले गेले असल्याचा दावा करण्यात आला. या ॲपने सोशल मीडियावरील टार्गेट ॲडच्या माधम्यातून लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला लोकांना १,५०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यातील ५०० रुपये परत मिळाले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याची ही त्यांची रणनिती होती. जसजसे ॲपवर छोट्या परताव्याची रक्कम दाखवण्यात आली, तसतसे अनेक लोक मोठा फायदा मिळवण्याच्या आशेने याकडे आकर्षित झाले. त्यानंतर फसवणूक करणारे मागे कोणताही पुरावा न सोडता अचानक गायब झाले.
या प्रकरणी गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर, बंगळूर, तुमकूर, मंगळूर, हुबळी, धारवाड, कलबुर्गी, शिवमोग्गा, बळ्ळारी, बिदर आणि हावेरी येथील पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी याची अधिक चौकशी सुरु केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या बंद असलेल्या अॅपवरील जाहिरातींमधून भरघोस परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. गुंतवणूकदाराने दिलेले प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर अॅपवरील डॅशबोर्डवर त्यांच्या कमाईत वाढ होत असल्याचे दाखवले जायचे. पण ही कमाई कधीच खरी नव्हती.
हावेरी जिल्ह्यात असे एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. याच फसव्या योजनेत अनेकांनी पैसे गमावले आहेत. पण ते तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलेले नाहीत.
एका तक्रारदाराने म्हटले आहे की, मला दररोज ३० रुपये जमा केले जायचे. एकूण ३०० रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्यानंतर मला ते काढण्याची परवानगी देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पैसे वेळेवर मिळत असल्याने आणि मी ते काढू शकत असल्याने, त्यांनी मला आणखी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. ५ हजार रुपयांपासून सुरू केलेली गुंतवणूक १ लाख रुपयांवर नेली. अखेर, त्यांनी पैसे काढायचे असतील कर भरा, असे सांगितले. पण त्यांनी पैसे काही परत केले नाहीत.