

बेळगाव ः सीमाभाग आणि दक्षिण भागातील महत्त्वाचे धार्मिक ठिकाण असतानाही सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थान परिसरात स्वच्छतेच्या अभावामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. दरवर्षी पाच महत्वाच्या पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. त्यामुळे या देवस्थानचा तिरुपतीच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून मंदिर आवारात गुटखा, पान मसाला, तंबाखू आदींवर बंदी असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशम मोहम्मद यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी मोहम्मद यांनी जिल्ह्यातील विकासकामांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यल्लम्मा देवस्थानाच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी मोहम्मद म्हणाले, सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानाच्या विकासासाठी दोन प्राधिकरणांची स्थापना करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मंदिराचे धार्मिक महत्त्व अबाधित राखण्यासाठी मंदिराच्या सभोवताही शंभर मीटर आवारात मोठा विकास करण्यात येणार नाही. तेथील मंदिर व इतर बाबींना हात लावण्यात येणार नाही. तर प्रामुख्याने भाविकांना सोयी देण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी लवकरच गुटखा, तंबाखू, पानमसाला विक्रीवर आणि खाऊन थूंकण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर मंदिराचा विकास होणार आहे. त्यामुळे याठिकाणी भक्त निवास, महाप्रसादासाठी सोय, रांगेसाठी इमारत, ऑनलाईन दर्शन सेवा, पुरेशे स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे. बैलगाडी घेऊन दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या बैलजोड्यांसाठी चारा छावण्या असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली.
रेणुका देवी मंदिर गाभार्यात यापुढे केवळ नियुक्त करण्यात आलेल्या दहा पुजार्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. देवस्थान परिसरात दारु विक्रीवर बंदी असून गुटखा, पान मसाला आणि मद्य पिऊन आलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.