

बंगळूर : राज्यात कन्नड भाषा बोलण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे त्रस्त बनलेल्या उद्योजकाने सहा महिन्यांत बंगळूरहून पुणे येथे उद्योग हलविण्याचा निर्धार केला आहे. आपले बिगर कन्नड भाषिक कर्मचारी कन्नडसक्तीचे बळी होऊ नयेत, यासाठी निर्णय घेतल्याचे उद्योजक कौशिक मुखर्जी यांनी जाहीर केले आहे.
मागील आठवड्यात बंगळूर येथील एका बँकेच्या व्यवस्थापकीने कन्नड येत नसून हिंदीतून संवाद साधण्याची विनंती केली होती. त्यावरून वादंग निर्माण झाले होते. कन्नड भाषेतून संवाद साधण्यासाठी दबाव आणण्यात आला. काही कन्नड संघटनांनी यासाठी आंदोलन केले. यामुळे राज्यभरात वाद निर्माण झाला होता.
बिगर कन्नड कर्मचार्यांवर करण्यात येणार्या कन्नड भाषेच्या सक्तीमुळे बंगळूरमधील उद्योजकाने आपला उद्योग पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयमध्ये घडलेल्या घटनेनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या एक्स अकांऊटवर जाहीर केले आहे.
माझे बिगर कन्नड कर्मचारी कन्नड संघटनांचे पुढचे बळी ठरू नयेत, असे मला वाटते. यामुळे मी बंगळूरहून पुण्याला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी लिहिले आहे. आपल्या कंपनीतील काही कर्मचार्यांनी केलेल्या भाषिक समस्येमुळे आपण हा निर्णय घेतला आहे. मी कर्मचार्यांच्या विचारांसी सहमत आहे. मी आमचे बंगळूरमधील कार्यालय पुढील 6 महिन्यांत बंद करून ते पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळूरच्या चांदपूर भागातील एसबीआय बँकेच्या शाखेत व्यवस्थापकाने एका ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला होता. मला कन्नड समजत नसून मी हिंदीत बोलेन, असे सांगितले होते. या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कन्नड संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यावर तीव्र टीका केली.
बंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनीही कन्नडचा आग्रह धरला होता. जर तुम्ही कर्नाटकात काम करत असाल, विशेषतः बँकिंगसारख्या क्षेत्रात, तर ग्राहकांना त्यांच्या भाषेत संवाद साधणे महत्त्वाचे आहे, असे सूर्या यांनी सांगितले होते. कर्नाटकातील बँका आणि इतर सार्वजनिक संस्थांनी स्थानिक भाषा बोलणारे कर्मचारी नियुक्त करावेत, अशी भूमिका घेतली होती.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही एसबीआय घटनेवर टीका केली. बँक व्यवस्थापकाचे वर्तन निषेधार्ह असल्याचे सांगितले होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाला देशभरातील बँकिंग कर्मचार्यांसाठी सांस्कृतिक आणि भाषा प्रशिक्षण लागू करण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यवस्थापकाची बदली करण्यात आली. बँक आणि व्यवस्थापक दोघांनीही माफी मागितली. व्यवस्थापकाने भविष्यात ग्राहकांशी व्यवहार करताना अधिक संवेदनशील राहण्याचे आश्वासन दिले आहे.