बेळगाव : उपनोंदणी कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नेहमीच तक्रारी केल्या जातात. सध्या काहीजणांनी तक्रारी केल्यामुळे लोकायुक्त विभागाचे अधिवक्ता शुभवीर जैन यांनी बुधवारी (दि. 6) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपनोंदणी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पाहणी केली. अचानक दाखल झालेल्या या पथकामुळे उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
उपनोंदणी कार्यालयामध्ये शुभवीर जैन दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम कागदपत्राची पाहणी केली. काही अधिकारी गैरहजर होते. याबद्दल उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांकडे चौकशी केली. त्या ठिकाणी योग्य प्रकारे नोंदी नसल्याचेही आढळून आले. काही रजिस्टरमध्ये चुकीचा उल्लेख केला होता. याबाबत त्यांनी चौकशी केली, त्यावर थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अधिकार्यांची चांगली झाडाझडती घेतली.
या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यामुळे जैन यांनी तुम्ही योग्य प्रकारे व वेळेत जनतेची कामे करत नसल्यामुळे ही गर्दी आहे. तेव्हा कार्यालयाच्या वेळेत हजर राहून जनतेची कामे भ्रष्टाचार न करता करावी, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे.
अशोकनगरमधील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी लोकायुक्त पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी तेथील कागदपत्राची पाहणी करून अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या कामांचा निपटारा तातडीने करा अशी सूचना त्यांनी केली.