बेळगाव : वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या लाईनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. धक्कादायक घटना म्हणजे सदर लाईनमनचा मृतदेह तीन तास खांबावरच लोंबकळत होता. याबाबत ग्रामस्थांनी हेस्कॉमला माहिती दिली. मात्र, तब्बल तीन तास अधिकारी अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना मरणहोळ (ता. यरगट्टी) येथे घडली.
मारुती आवळी ( रा. बगरनाळ) असे त्या दुर्दैवी लाईनमनचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मारुती दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढले. मात्र त्यांना जोरात विजेचा धक्का बसला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जोरदार आवाज आला. त्यामुळे मरणहोळ गावातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी तातडीने हेस्कॉमला याची माहिती दिली.
मात्र, माहिती देऊनही अधिकारी किंवा कर्मचारी याकडे फिरकले नाहीत. तब्बल तीन तास मृतदेह खांबावरच लटकत होता. विजेच्या धक्कयामुळे मृत्यू झाल्याने त्या ठिकाणी जाणेदेखील मुश्किल झाले होते. मृतदेह लटकत असलेला पाहून सारेच हळहळत होते. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे संतापाची लाट उसळली होती.
अधिकारी दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जनतेला शांत केले. बर्याच उशिरानंतर मृतदेह खांबावरून खाली उतरवण्यात आला. त्यानंतर यरगट्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.