

बेळगाव : महाराष्ट्रात शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा आदेश काढण्यात आला होता. मात्र, मनसे व शिवसेना (ठाकरे गट) यांनी आंदोलनाचा इशारा देताच सदर आदेश सरकारने मागे घेतला. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेनेेे शनिवारी (दि.5) वरळी डोम येथे विजयी सभा घेतली. या सभेच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर दोन भाऊ एकाच मंचावर एकत्र आल्याने बेळगावात जल्लोष करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मराठी भाषिकांनी एकत्र येऊन जल्लोष केला. नगरसेवक रवी सांळुखे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसाची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत होती. पण उशिरा का होईना मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र आल्याने जनता खूष आहे, असे नगरसेवक रवी सांळुके यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, मनसेेचे अध्यक्ष व नगरसेवक रवी सांळुखे, प्रवीण तेजम, विनायक हुलजी, विठ्ठल उंदरे, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, विजय भोसले, महादेव पाटील, सिद्धार्थ भातकांडे, वैशाली भातकांडे आदींसह शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते तसेच मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.