पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर, हालशुगर कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळील नव्या भुयारी मार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला समोरून धडक दिल्याने सागर मल्लापा तावदारे (वय २७, रा. कुन्नूर ता. निपाणी) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांत नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर तावदारे हा कागल एमआयडीसीतील एका कंपनीत कामावर होता. रविवारी काही कामानिमित्त तो दुचाकीवरून निपाणीकडे येत होता. महामार्गावरील भुयारी मार्गात प्रवेश करताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या हिरेबागेवाडी येथून आसुर्ले–पोर्ले (कोल्हापूर) कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या मोठ्या ट्रकला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की सागर तावदारे दुचाकीवरून फेकला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ रस्ता खोळंबला होता. घटनास्थळावर रस्ते देखभाल करणाऱ्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी भेट देऊन पोलिसांना कळवले. त्यानंतर सीपीआय बी.एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रशांत कुदरी यांनी घटनास्थळी पाहणी केली.
सागर तावदारे हा मनमिळावू आणि हळव्या स्वभावाचा असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या अकाली निधनाने कुन्नूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान पोलिसांनी ट्रकचालक संतोष कडव (रा. गारगोटी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.