

हातकणंगले : आळते (ता . हातकणंगले) येथील कारंडे मळ्यातील अमित पाटील यांच्या बाथरूममध्ये 105 डिटोनेटर स्फोटकांचा साठा रविवारी सापडला. हातकणंगले पोलिसांनी हा साठा जप्त करून गोपाललाल मांगीलाल जाट (वय 40, रा. पिराप्पा पाटील मळा, मजले, ता. हातकंणगले) या परप्रांतीयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. यावेळी दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या डिटोनेटरच्या स्फोटकासह एक मोबाईल असा सुमारे 2 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हेडकॉन्स्टेबल नवनाथ विलास कदम यांनी दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी ः गोपाललाल जाट हा परप्रांतीय असून मजले गावच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून राहतो. त्याचा दगड उत्खनन केल्या जात असलेल्या खणींमध्ये ट्रॅक्टरद्वारे छिद्रे पाडून ब्लास्ट करण्याचा व्यवसाय आहे; मात्र त्याच्याकडे स्फोटके साठवण करण्याचा कोणताही परवाना नाही, तरीसुद्धा गेल्या कित्येक वर्षांपासून तो हा व्यवसाय करत आहे. ट्रॅक्टरवरील एका विशिष्ट ठिकाणी ही स्फोटके लपवून खणीत ब्लास्ट करण्यासाठी नेली जात होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर विभागाच्या पथकाला याबाबतची माहिती मिळताच कारंडे मळ्यात छापा टाकण्यात आला. यावेळी अमित पाटील यांच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेल्या डिटोनेटरच्या स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला.
हातकणंगले पोलिस अनभिज्ञ
हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई करून स्फोटांचा साठा पकडला; मात्र या कारवाईपासून हातकणंगले पोलिस अनभिज्ञ कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.