Tawandi Ghat accident
निपाणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर भरधाव ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी) जागीच ठार झाले. तर दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की, अपघातग्रस्त ट्रकसह कारचा पूर्णतः चक्काचूर झाला. शिवाय ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतवडीत (मातीत) जाऊन अडकला. तर कार चक्काचूर होत संरक्षण कठड्याला जाऊन धडकली.
सोहेल अब्दुलरहीम मणेर (वय ३६, मुळगाव सांगरूळ ता. करवीर जि. कोल्हापूर, सध्या राहणार गजानन कॉलनी फुलेवाडी, कोल्हापूर) व विनोद हैबतराव पाटील (वय ३२, रा.कोरोची, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. नहीम हसीमपिर मोमीन (वय ३२, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) व अंजुम राजेखान पिंजार (वय ३५, रा. किणी वाठार, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, इंडोको रेमिडीज लिमिटेड या औषध कंपनीकडे एरिया मॅनेजर म्हणून काम करत असलेले सोहेल अब्दुलरहीम मणेर हे कारने सोमवारी सकाळी कोल्हापूर येथून सावंतवाडी, कणकवली व कुडाळ परिसरात रिप्रेझेंटिव्ह म्हणून कंपनी कामासाठी विनोद हैबतराव पाटील, नहीम हसीमपीर मोमीन व अंजुम राजेखान पिंजारी या तिघांना घेऊन गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते कोल्हापूर येथे परतत होते. कार अंजुम पिंजारी हे चालवत होते.
दरम्यान त्यांची कार तवंदी घाट उतारावर हॉटेल अमरनजीक असलेल्या भुयारी मार्गाजवळ आली असता मागून चिक्कमंगळूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या स्टील वाहतूक ट्रकचालक जाफर सय्यद (वय ३२ ) यांचा ताबा सुटल्याने ट्रकची कारला मागून जोराची धडक बसली. यावेळी ट्रकने कारला फरपटत नेल्याने कारमध्ये डाव्या बाजूला बसलेले सोहेल मणेर व विनोद पाटील हे जागीच ठार झाले. तर नहीम मोमीन व अंजुम पिंजारी हे जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल आवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे व संतराम माळगे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार सीपीआय बी. एस. तळवार, शहर पो. ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. चिकोडी, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व मयतांचे निपाणी येथील नातेवाईक व मित्र माजी सभापती जुबेर बागवान, माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, अनिस बागवान, अस्लम शिकलगार यांच्याकरवी ओळख पटवीत जखमींना सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
प्राथमिक उपचारानंतर जखमी दोघांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. यावेळी मयत झालेल्या दोघांच्याही नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान ट्रक चालक जाफर सय्यद याला वाहनासह ताब्यात घेऊन शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.