Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

नेमळे येथील एरंडोकवाडीत थार जीप रस्त्याबाहेर जाऊन उलटली
Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
Pudhari
Published on
Updated on

Fatal Crash Mumbai Goa Highway

पणजी/सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात सोमवारी ( दि. २२) दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास थार वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोव्यातील गिरी परिसरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे जात असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०३-एएम-८४७८ क्रमांकाची थार कार नेमळे मार्गे कणकवलीकडे जात होती. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याबाहेर जाऊन जोरदार धडकले. अपघाताची तीव्रता इतकी होती की, थार वाहनाचा चक्काचूर झाला.

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
Mumbai Goa Highway Bypass: माणगाव बायपास गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा; भरत गोगावले यांचे अधिकारी, ठेकेदाराला निर्देश

या अपघातात श्रीमती नानोडकर (वय ४३, रा. गिरी, गोवा) आणि विलासिनी सातार्डेकर (वय ५३, रा. भिरवंडे, कणकवली) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातात चालक सनी नानोडकर (वय ४०), उज्वला कांबळी (वय ५०) आणि पांडुरंग नानोडकर (वय ६५, सर्व रा. गिरी, गोवा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक आणि निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, नेमळे येथील ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
Mumbai Goa Highway: महामार्ग अजूनही अपूर्णच; जनतेचा आक्रोश सुरू

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत तसेच परिचारिका गोसावी व नाईक यांनी जखमींवर उपचार केले.

दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, शैलेश नाईक, रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत मदतकार्य केले. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनीही रुग्णालयात भेट देऊन पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news