कारवार : विदेशात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याबद्दल एका महिलेसह दोघांवर होन्नावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाफर सादिक (रा. होन्नावर, जि. कारवार) आणि सुजाता (रा. हैदराबाद) अशी संशयितांची नावे आहेत. बिच्चू जंतील असे तक्रारदाराचे नाव आहे. 2024 च्या डिसेंबरमध्ये कुवैतमध्ये संरक्षण विभागातील काही पदांची भरती होणार आहे, असे जाफर सादकने बिच्चूला सांगितले.
ही माहिती बिच्चूने आपला मित्र नौशादला सांगितली. त्यानंतर जाफर आणि नौशादच्या माध्यमातून 33 बेरोजगारांनी कुवैतमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. त्यानंतर त्यांना पासपोर्ट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हैदराबादहून सुजातानेही बिच्चूकडून कागदपत्रांच्या कामासाठी पैसे मागितले. बिच्चूने 2.82 लाख रुपये जमा केलेे. त्यानंतर व्हिसा येण्यासाठी तीन महिने लागतील, असे सुजाताने बिच्चूला सांगितले. अशाच पद्धतीने इतर 33 लोकांकडूनही पैसे उकळण्यात आले. मात्र तीन महिने उलटून गेले, तरी व्हिसा आले नाहीत. त्यामुळे बिच्चूने सुजाता आणि जाफर सादिक यांच्याविरुद्ध होन्नावर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.