बेळगाव

KPSC Exam Scam : आयएएस ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना अटक! केपीएससी परीक्षा घोटाळाप्रकरणी सीआयडीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्‍या (केपीएससी) पशुवैद्यकीय अधिकारी परीक्षेतील कथित अनियमितता व गैरव्यवहारप्रकरणी अखेर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (आयएएस) तथा उद्योग व वणिज्य विभागातील एमएसएमई संचालक ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना अटक करण्‍यात आली. २०१६ च्या बॅचचे असलेल्‍या गंगवार यांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान सहकार्य न केल्‍याचा ठपका ठेवून गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने (सीआयडी) ही कारवाई केली.

शुक्रवारी सीआयडीच्या पथकाने त्यांची सुमारे नऊ तास चौकशी केली होती. फेब्रुवारी २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत केपीएससीमध्ये परीक्षा नियंत्रक पदावर कार्यरत होते. याच कालावधीत मागील वर्षी केपीएमसीने आयोजित केलेल्‍या पशुवैद्यकीय अधिकारी परीक्षा व भरतीमध्‍ये घोटाळा झाल्‍याचे प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर राज्‍य सरकारने त्‍यांची उचलबांगडी करून उद्योग व वणिज्य विभागात एमएसएमई संचालकपदी नियुक्‍ती केली होती.

काय आहे प्रकरण

पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीत केपीएससीच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. परीक्षा घोटाळा आणि मनी लाँडरिंगप्रकरणी सुरुवातीला विधानसौध पोलिस ठाण्यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला होता. २८ जुलै रोजी हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले. तपासादरम्‍यानच २३ ऑगस्टला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बंंगळूर व बरेली येथील त्यांच्या निवासस्थानांवर छापेही टाकले होते; तर रविवारी एक पथक नवाबगंजच्‍या हिमकरपूर चमरौआ गावातील घरीही पोहोचले होते.

गायब झाले अन्‌ प्रकटले

प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ज्ञानेंद्र कुमार गंगवार अचानक गायब झाले होते. २० ऑगस्‍टला दुपारी ३ च्‍या सुमारास ते विमानाने दिल्‍लीला गेले होते. यासाठी त्‍यांनी ३२०० रुपयांचे तिकीटही खरेदी केले होते. मात्र, गंगवार हे गायब झालेले नसून वडिलांची प्रकृती बिघडल्‍याने दिल्‍लीहून उत्तर प्रदेशातील घरी गेल्‍याचा दावा कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी केला होता. यानंतर गंगवार चौकशीसाठी सीआयडीपुढे हजर झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT