

बेळगाव : शिवम असोसिएट्सच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग केल्याच्या आरोप असलेल्या कंपनीचा प्रमुख शिवानंद सिद्धप्पा नीलण्णावरला मंगळूरमधील तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. ईडी कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याला सोमवारी (दि. २४) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरु असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे स्वरुप आणि व्याप्ती लक्षात घेता संशयितला तत्काळ जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भूमिका ईडीकडून मांडण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नीलण्णवरचा जामीन अर्ज नामंजूर करुन त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
नीलण्णावरला ईडीने १३ ऑगस्ट रोजी बेळगावातून अटक केली होती. मनी लाँडरिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन त्याची चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत १२ दिवसांची ईडी कोठडी मंजूर केली होती. या कालावधीत त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, निधीचा प्रवाह आणि गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या रकमेबाबत तपास करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ईडीने मनी लाँडरिंगच्या शक्यतेचा तपास हाती घेतला आहे. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार शिवम असोसिएट्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला. या आर्थिक व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय असून निधीचा नेमका वापर आणि त्याचा प्रवाह शोधण्याचे काम ईडीकडून सुरु आहे.