political leadership: पुढची अडीच वर्षेही मीच मुख्यमंत्री file photo
बेळगाव

political leadership: पुढची अडीच वर्षेही मीच मुख्यमंत्री

सिद्धरामय्या; पक्षाध्यक्ष खर्गे आज बंगळुरात, दिल्लीहून विशेष प्रतिनिधीही येणार

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : नेतृत्व बदलावर ठाम असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांचा पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या अस्वस्थ झाले असले, तरी पुढील अडीच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावर काहीशी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवकुमारांनी त्यांना ‘ऑल द बेस्ट’ असे म्हटले आहे.

दुसरीकडे शिवकुमारांचे भाऊ डी. के. सुरेश यांनी शिवकुमारांसाठी आमदारांशी स्वतंत्र चर्चा सुरू केली आहे. शिवाय कृषिमंत्री चेलुवराय स्वामी यांच्यासह सुमार 15 आमदार दिल्लीला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संवाद साधल्याचेही समजते, ही चर्चा 20 मिनिटे चालली.

दिवसभरातील तिसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दलित आमदारांची शुक्रवारी स्वतंत्र बैठक घेतली. दलित नेत्याला मुख्यमंत्री करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, पक्षाध्यक्ष खर्गे शनिवारी बंगळुरात दाखल होत असून, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

म्हैसूरमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, मी मुख्यमंत्री म्हणून माझा कार्यकाळ पूर्ण करणार असून पुढील दोन्ही अर्थसंकल्पही मी सादर करणार आहे; मात्र नेतृत्वबदल व मंत्रिमंडळ फेरबदलावर हायकमांडने घेतलेल्या निर्णयाचे मी पालन करणे जसे गरजेचे आहे, तसे बाकी आमदार व उपमुख्यमंत्र्यांनीही पालन करणे महत्त्वाचे आहे.

काँग्रेस आमदार हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला गेल्याची मला माहिती नाही; पण कृषिमंत्री चेलुवराय स्वामी दिल्लीत आहेत. मी त्यांच्याशी बोललो असून त्यांनी सांगितले की, ते मका पिकासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आहेत. राज्यातील कोणत्याही आमदारांनी दिल्लीला जायची गरज नाही; मात्र ज्याला जायचे असेल त्याने जावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

नेतृत्व बदल किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाबात आधीही चर्चा झाल्या, अजूनही केल्या जात आहेत. हायकमांड त्याला काय उत्तर देते, ते मला आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनाही मान्य राहील, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

खर्गे आज बंगळुरात

शनिवार, 22 रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बंगळूरला येत असून ते प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या हे पद शिवकुमारांकडे आहे; मात्र ते सोडण्याची तयारी त्यांनी दोन दिवसांपूर्वी दर्शवली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष बदलल्यास ती मुख्यमंत्री बदलाची नांदी असेल, असे मानले जाते. मुख्यमंत्री सिद्धरामय्याही खर्गेंची भेट घेणार आहेत.

मी काँग्रेसच्या सर्व 140 आमदारांचा नेता

राज्यात नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे; मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील अडीच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे अभिनंदन केले आहे. शुक्रवार, दि. 21 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मी गटतटाचा नेता नाही. गटबाजी करणे माझ्या रक्तात नाही. मी काँग्रेसच्या सर्व 140 आमदारांचा नेता आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी म्हटले आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांना शुभेच्छा! प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी सर्व 140 काँग्रेस आमदारांचा नेता आहे. आमच्याकडे कोणताही गट नाही.

गटबाजीच्या राजकारणावर मी विश्वास ठेवत नाही. सर्व 140 आमदार माझ्या गटात आहेत. नेतृत्व बदलावर हायकंमाड काय निर्णय घेईल, तो मुख्यमंत्री स्वीकारतील. हायकमांडने मंत्रिमंडळात फेरबदलाचा निर्णय घेतला, तर मुख्यंमत्री मंत्रिमंडळात फेरबदल करतील. शिवकुमार पुढे म्हणाले, मंत्रिपदावर नजर ठेवणार्‍या अनेक आमदारांनी त्यांना भेटून आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यालाा गटबाजी म्हणणे चुकीचे आहे. काही आमदार कदाचित याच कारणासाठी दिल्लीला गेले असतील. हायकमांडला भेटून मंत्री बनवण्याची विनंती करतील; मात्र मी कोणत्याही आमदारांना दिल्लीला जाऊन मला मुख्यमंत्री करा, असे सांगितलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT