संकेश्वर : हिरा शुगरसाठी संघर्ष शिगेला पोहोचला असून ए. बी. पाटील आणि कत्ती गट एकत्र आला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हिरा शुगरच्या संचालक मंडळाने माजी खा. रमेश कत्ती यांच्या पाठबळावर कारखाना सहकार तत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याकामी कामगार व शेतकर्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी केले.
येथील कारखाना आवारात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. निखिल कत्ती होते. ए. बी. पाटील म्हणाले, हिरा शुगर गेल्या 6 महिन्यांपूर्वी माजी खा. अण्णासाहेब जोल्ले यांच्या मदतीने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, कारखान्याला लागणारा अर्थपुरवठा विचारात घेता अखेर कत्ती यांच्याकडे सहकार तत्त्वावर कारखाना सोपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कारखान्याच्या हितासाठी रमेश कत्ती व आपण मार्गदर्शन करणार आहोत. आगामी तालुका वीज संघाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल.
माजी खा. रमेश कत्ती यांनी, माजी मंत्री ए. बी. पाटलांच्या मार्गदर्शनाने हिराशुगर सहकार तत्त्वावर चालवण्याचा निर्णय संचालकांचा आहे. त्याला आपण सहकार्य करू. गत 5 महिन्यांत झालेल्या कारखान्याच्या आरोप-प्रत्यारोपाला महत्त्व न देता कामगार व शेतकर्यांच्या हितासाठी प्राध्यान्य देऊ, असे सांगितले. आ. निखिल कत्ती यांनी माजी खा. रमेश कत्ती व माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या सल्ल्याने सर्व संचालक मिळून कारखान्याला गतवैभव मिळवून देणार असल्याचे सांगितले.
सकाळी ग्रामदैवत शंकराचार्य संस्थान मठात देवदर्शन घेऊन सर्व राजकीय मंडळींनी हिरा शुगर ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.