संकेश्वर : प्रतिनिधी
फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून तब्बल 25 लाख रुपयांची रोकड लांबवली. ही घटना संकेश्वर बसस्थानक परिसरात घडली आहे. खिडकीचे गज कापून आत प्रवेश करण्यात आला असून, हे कृत्य माहीतगाराचेच असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
संकेश्वर बसस्थानक परिसरातील जुना पुणे-बंगळूर रोडनजीक असलेल्या पेडणेकर कॉम्प्लेक्समधील दुसर्या मजल्यावरील फुल्ट्रॉन या फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडण्यात आले आहे. सोमवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
फुल्ट्रॉन ही महिला आणि बचत गटांना पैसे देव-घेव करणारी कंपनी आहे. कंपनीचे काम रात्री उशिरापर्यंत चालते. त्यामुळे काही कर्मचारी कार्यालयातच वस्तीला असतात. मात्र, दुसरा शनिवार आणि रविवार अशी जोडून सुटी आल्याने हे वस्तीला असणारे कर्मचारीही आपापल्या गावी गेले होते. त्याचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत मागच्या बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला आणि कार्यालयात असणारी 25 लाखांची रोकड लांबविली. सोमवारी सकाळी कार्यालयामध्ये कर्मचारी आले असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती फुल्ट्रॉनचे शाखा व्यवस्थापक भागप्पा महालिंगपूर यांनी साडेदहा वाजता संकेश्वर पोलिसांना कळवली. उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या तपासासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक आजूबाजूच्या परिसरामध्येच घुटमळले. दुपारी घटनास्थळी अतिरिक्त ज़िल्हा पोलिसप्रमुख रामलक्ष्मण आरेसिद्ध, गोकाकचे डीएसपी डी. टी. प्रभू , सीपीआय जी. आय. कल्याणशेट्टी यांनी भेट दिली आहे .
चोरटा माहीतगार
अज्ञात चोरट्याला कार्यालयाच्या रचनेबाबत सर्व माहिती असल्याचे दिसते. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची दिशा, खिडकीतून आत कसा प्रवेश करावयाचा, तिजोरीत असणारे पैसे, दोन दिवस सुट्टी असल्याने कार्यालयात वस्तीला कोणीही नाही याची पूर्ण माहिती त्याला होती. चोरट्याने तोंडाला मास्क आणि हातमोजे वापरले आहेत. सीसीटीव्हीत हे चित्रीकरण कैद झाले आहे .
'पुढारी'ने दिला होता धोक्याचा इशारा
संकेश्वरमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या हायटेक बस स्थानक परिसरातील सुरक्षा रामभरोसे झाली आहे. पोलीस बंदोबस्त ढिला पडला असल्याचे आजही बोलले जात आहे. मागील आठवड्यात नेहमी गजबजलेल्या बसस्थानकात खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रत्नही उघडकीस आला आहे. नुकताच गोटूर येथील लक्ष्मी मंदिरामध्ये चोरीचा प्रयत्न झाला. त्यानंतर 'पुढारी'ने 2 नोव्हेंबर रोजी संकेश्वर बसस्थानक परिसरातील सुरक्षा रामभरोस या मथळ्याखाली सविस्तर बातमी छापून धोक्याची कल्पना दिली. ते वृत्त सोमवारी सत्यात उतरले.