बेळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दोन दिवसांपासून संततधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील नदींमध्ये खालावलेल्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवेत गारठा वाढला असून जनजीवन गारठले आहे. भात पिकाला हा पाऊस पोषक असला तरी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.
पावसाने मागील पंधरा दिवसांपासून दडी मारली होती. दसरोत्सवाला प्रारंभ होताच हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. गुरुवारपासून पावसाचा वेग वाढला आहे. शुक्रवारी (दि.26) रात्रीपासून त्यामध्ये अधिक वाढ झाली.
जिल्ह्यात शनिवारी (दि. 27) पावसाने तळ ठोकला. दिवसभर संततधार पावसाच्या सरी कोसळल्या. मध्यंतरी पाऊस गायब झाल्याने वाढलेला उष्मा गायब झाला असून हवेत गारठा वाढला आहे.
बेळगाव शहर परिसरात पावसाचा शुक्रवारी रात्रीपासून जोर होता. शनिवारी दिवसभर पाऊस कायम होता. रात्रीच्या तुलनेत दिवसा पावसाचा जोर कमी होता. जोरदार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले. गटारी तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात अडथळा आला. यामुळे नागरिकांना कसरत करावी लागली. पावसाने जुनाट झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. वडगाव येथील दत्त गल्ली येथे जुनाट झाड कोसळले. त्याखाली सापडलेल्या दुचाकीचे नुकसान झाले. त्याचबरोबर कॅम्प येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर फांदी कोसळली. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. फांदी हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. परंतु जोर कमी होता. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
ग्रामीण भागात पावसाचा जोर होता. सध्या भात पिके पोटरीला आहेत. त्यामुळे शेतकर्यांकडून पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. परंतु, पूर्व भागात सोयाबीनची सुगी सुरू झाली आहे. त्यांना पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन भिजून शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. मार्कंडेय नदीतील पाणी पातळी खालावली होती. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे.