अनमोड : जप्त करण्यात आलेली दारू आणि संशयितासमवेत अबकारीचे अधिकारी. pudhari photo
बेळगाव

Illegal Liquor Transport : गोवा बनावटीची २६७ लिटर दारू जप्त

तमिळनाडूतील एकाला अटक; ट्रकसह २१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

रामनगर : गोव्यातून तमिळनाडूकडे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी नेण्यात येणारी २६७ लिटर गोवा बनावटीची दारू अनमोड तपासणी नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. या कारवाईत २० लाख रुपये किमतीचा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून तमिळनाडूतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

दि. ६ रोजी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास अनमोड तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना सदर ट्रक संशयावरून थांबविण्यात आला. तपासणी केली असता ट्रकच्या मागील बाजूस चार गुप्त कप्पे तयार केल्याचे आढळले. या कप्प्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून वाहतूक केली जात होती.

या कारवाईत १ लाख २० हजार रुपये किमतीची २६७ लिटर दारू आणि २० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तमिळनाडू राज्यातील कृष्णगिरी येथील अरुळमणी शेखर याला अटक करण्यात आली. तो गोव्यातून स्वतःच्या घरी विक्रीसाठी दारू घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त आयुक्त बालकृष्ण एच.सी. यांच्या निर्देशानुसार कारवारचे जिल्ह्याचे उत्पादन शुल्क उपआयुक्त अमानुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यल्लापूर विभागाचे उत्पादन शुल्क उपअधीक्षक श्रीशैल अवजी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. संशयिताला पुढील कारवाईसाठी दांडेली विभागाच्या उत्पादन शुल्क उपनिरीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT