

धारवाड : रवी हिरेमठ
सायबर गुन्हेगारीबद्दल जनजागृती करूनही फसवणूक करणारे अनेक मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेतच. देशातील लोक दररोज कोट्यवधी रुपये गमावत आहेत. सायबर भामटे ही लुटलेली रक्कम भाडोत्री खात्यांमध्ये ठेवतात आणि नंतर हवे तेव्हा ती रक्कम काढतात. अशी पाच कोटींची रक्कम हुबळीतील बँकांमधून काढली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळूर पोलिसांनी तशी माहिती हुबळी पोलिसांना कळवली असून, सीईएन विभाग तपास करत आहे.
सायबर भामट्यांनी लुटीचे पैसे काढण्यासाठी हुबळीचा वापर केल्याचे उघड झाले आहे. बंगळूर सायबर गुन्हे युनिटने ही माहिती गोळा करून हुबळी सीईएनला कळवली आहे. उपलब्ध माहितीनुसार भामट्यांनी हुबळीतील पाच बँकांमध्ये चेक जारी करून कोट्यवधी रुपये काढल्याचे आढळून आले आहे.
भाडोत्री खाती सायबर भामट्यांनी हुबळीतील काही लोकांचा वापर करून त्यांच्या नावे बँकांमध्ये खाती उघडली. काही खाती हुबळीतील बँक ऑफ बडोदामध्ये उघडण्यात आली आहेत. खातेधारकांनी खाती उघडल्यानंतर त्याला जोडला गेलेला मोबाईल क्रमांक, एटीएम कार्ड आणि पासबुक भामट्यांना दिले. त्याच्या बदल्यात खातेधारकांना ठरावीक रक्कम मिळाली. हुबळी सीईएन पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता लुटली गेलेली रक्कम चेकद्वारे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
खाती भाडोत्री घेऊन व्यवहार करणे, हा नवा प्रकार भामट्यांनी सुरू केला आहे. त्यानुसार भामटे लोकांना फसवून त्यांच्या खात्यांवरचे पैसे या भाडोत्री खात्यांवर वळवतात आणि नंतर खातेधारकाना ठरावीक हिस्सा देऊन ते पैसे काढून आणण्यास सांगतात आणि स्वतः वापरतात. त्यानुसार चेकद्वारे प्रत्यक्षात खातेधारकांनी पैसे काढले की स्वतः भामटेच बँकेत चेक घेऊन गेले, हाही तपास सुरू आहे.
हुबळीमध्ये सायबर गुन्ह्यांमधून पैसा काढला जात आहे आणि हुबळीतील काही लोकांनी उघडलेली खाती सायबर फसवणूक करणाऱ्यांना विकल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ही बाब चिंताजनक आहे. यामुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांनी हुबळीमध्ये आपले बस्तान बसवले आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. या संदर्भात, पोलिसांनी या फसवणूक करणाऱ्यांचा स्रोत शोधून त्यांना तुरुंगात पाठवणे आवश्यक आहे.