बेळगाव : निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात झालेली गर्दी.  (Pudhari File Photo)
बेळगाव

Gaundwad Murder Case | महिलेसह पाचजणांना जन्मठेप

गौंडवाड खून प्रकरण; महिला, तरुणीसह अन्य चौघांना वर्षाच्या शिक्षेसह दंड

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गौंडवाडमधील मंदिराच्या जागेवरून झालेल्या खून प्रकरणी न्यायालयाने महिलेसह पाचजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्य चौघांना एक वर्षाची शिक्षा व दंड ठोठावला. द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी शनिवारी (दि. 23) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या सर्व आरोपींना सुमारे 13 लाख 75 हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. यापैकी 10 लाख मृताच्या पत्नीला तर दोन लाख रुपये आईला द्यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी निम्मे गौंडवाड गाव न्यायालयासमोर दिवसभर थांबून होते. निकालानंतर मृताची पत्नी पूजा सतीश पाटील यांना अश्रू अनावर झाले. तीन वर्षांनी आपल्याला न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जन्मठेप झालेल्यांमध्ये आनंद रामा कुट्रे (वय 60), अर्णव आनंद कुट्रे ( 26), जायाप्पा भैरू निलजकर (52), महांतेश जायाप्पा निलजकर (23) व शशिकला आनंद कुट्रे (50, सर्वजण रा. गौंडवाड) यांचा समावेश आहे. तर सुरेखा जायाप्पा निलजकर (47), संजना जायाप्पा निलजकर (21), वसंत पुंडलिक पाटील (27) व परशुराम मारुती मुतगेकर (47, सर्वजण रा. गौंडवाड) यांना एक वर्षाची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, गौंडवाडमधील भैरवनाथ मंदिराची जागा काहीजण हडप करत असल्याच्या संशयातून गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील (40, रा. भैरवनाथ गल्ली, गौंडवाड) यांनी आवाज उठवला होता. परंतु, त्यांच्यावर राग व्यक्त करत चिडलेल्या काहीजणांनी त्यांचा 18 जून 2022 रोजी जांबियाने भोसकून खून केला होता. या घटनेनंतर गावात वाहनांची जाळपोळ व घरांवर दगडफेकही झाली होती. तब्बल महिनाभर गावांमध्ये तणावाचे वातावरण होते. खूनप्रकरणी 25 जणांवर काकती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी होऊन 19 ऑगस्ट रोजी आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. त्यावर शनिवारी सुनावणी होऊन संबंधितांना शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. जी. के. माहुरकर यांनी काम पाहिले. सरकारी वकिलांचे मदतनीस तसेच फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार यांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

चौघांना झालेल्या शिक्षेची तरतूद

जन्मठेपेव्यतिरिक्त महिला व तरुणीसह चौघांना भादंवि कलम 323 अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. यामध्ये प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा व एक हजाराचा दंड. दंड न भरल्यास महिन्याचा साधा कारावास. सदर चौघा आरोपींना वरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा देखील आहे.

पाच आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेतील तरतूद

भादंवि कलम 302 व सहकलम 149 अंतर्गत जन्मठेप व पाचजणांना प्रत्येकी दोन लाखांचा दंड. दंड न भरल्यास दीड वर्षांचा कारावास

भादंवि कलम 307 व सहकलम 149 अंतर्गत सात वर्षांचा कारावास व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड. तो न भरल्यास एक वर्षाचा कारावास

भादंवि कलम 148 व सहकलम 149 अंतर्गत दोन वर्षांचा साधा कारावास व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड. तो न भरल्यास तीन महिने कारावास

भादंवि कलम 147 सहकलम 149 अंतर्गत एक वर्षाचा साधा कारावास व प्रत्येकी 7,500 रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिन्याचा साधा कारावास.

डोळ्यांत अश्रू, कारागृहात रवानगी

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जन्मठेप झालेल्या गुन्हेगारांना धक्का बसला. शिक्षा ऐकताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. निकालनंतर उशिरापर्यंत ते न्यायालयाच्या आत थांबून होते. सायंकाळी त्यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयातून बाहेर काढून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी मार्केटचे पोलिस निरीक्षक महांतेश धामण्णवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर, शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी, एपीएमसीचे निरीक्षक उस्मान आवटी, खडेबाजारचे उपनिरीक्षक श्रीशैल गाबी, उपनिरीक्षक आनंद ए. वाय., कॅम्पच्या उपनिरीक्षक रुक्मिणी ए. यांच्यासह अन्य ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. हे देखील न्यायालय आवारात होते. ते खटल्याच्या निकालाची अधिकार्‍यांकडून माहिती घेत होते. निकालाबाबत उत्सुकता असल्याने सकाळपासूनच टीव्ही व मुद्रण माध्यमाचे प्रतिनिधी सकाळपासूनच थांबून होते. वकीलही या निकालाची उत्सुकतेने प्रतिक्षा करत होते. शिवाय आपल्या कामासाठी आलेले अशीलही सुनावणीची माहिती घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT