Gadhinglaj Yamgarni Mother Son Death
मधुकर पाटील
निपाणी : नजीकच्या यमगर्णी गावात गेल्या दहा दिवसांपासून आनंदाचे वातावरण होते. दरवर्षीप्रमाणे अत्याळ (ता.गडहिंग्लज) गावच्या आऊबाई अर्जुन सुतार (वय ८५) या आपल्या लेकीकडे आल्या होत्या. घरात नातवंडांचा गोंधळ, लेकीचे प्रेम आणि गावातील ओळखीच्या माणसांच्या भेटीगाठी यामुळे आऊबाई आनंदात होत्या. मात्र बुधवारी सायंकाळी नियतीने असा घाला घातला की, अवघ्या दोन तासांत माय-लेकांचा जीव गेला आणि सुतार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
आऊबाई यांचे मूळगाव अत्याळ. मात्र, त्या करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे मामाकडे राहत होत्या. मुलगा विजय सुतार हा मुंबईतील अंधेरी येथे नोकरी करत होता. त्यामुळे सुतार कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. तरीही आऊबाई दरवर्षी उन्हाळ्यात यमगर्णी येथील मुलगी निलाबाई यांच्या घरी आवर्जून यायच्या.
यंदाही त्या दहा दिवसांपूर्वी लेकीकडे आल्या होत्या. अधिक महिना असल्याने गेल्या काही दिवसांत त्यांनी देवदर्शनही केले होते. बुधवारी सायंकाळी त्या लेकीसाठी साडी घेण्यासाठी गावातील दुकानात गेल्या. साडी घेऊन आनंदाने घरी परतल्या. “ही साडी तुला छान दिसेल,” असे म्हणत त्यांनी लेकीच्या हातात साडी दिली. पण काही क्षणांतच त्यांच्या पाठीत तीव्र कळ आली आणि त्या अस्वस्थ झाल्या.
यावेळी घाबरलेल्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने निपाणी येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरातील आनंद क्षणात शोकात बदलला.आईच्या निधनाची बातमी भाचा संदीप सुतार यांनी मामा विजय सुतार यांना फोनवरून दिली. फोनवरील काही क्षण शांततेत गेले. त्यानंतर विजय यांनी थरथरत्या आवाजात “आईला बर्फ कक्षात ठेवा... मी लगेच निघतो,” एवढेच सांगितले. आईला अखेरचा निरोप देण्यासाठी निघण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने आणखी एक आघात केला.
रात्री सुमारे नऊच्या सुमारास विजय सुतार (वय ५५) यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नसल्याची भावना नातेवाईक व्यक्त करत होते. यमगर्णीमध्ये गुरुवारी दुपारी माय-लेकांचे पार्थिव एकत्र आणण्यात आले. तेव्हा गावकऱ्यांचे डोळे पाणावले. एका बाजूला वृद्ध आईचा पार्थिव देह आणि दुसऱ्या बाजूला तिच्या विरहाने गेलेल्या मुलाचा देह पाहून वातावरण सुन्न झाले होते. अंत्यसंस्कारावेळी अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.
आऊबाई यांच्या पश्चात तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. तर विजय यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.“माय-लेकांच्या या अतूट नात्याची अखेर इतक्या वेदनादायी पद्धतीने होईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.”
आईच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर विजय सुतार काही काळ निशब्द झाले होते. “आईला बर्फकक्षात ठेवा... मी लगेच निघतो,” हे त्यांचे शब्द नातेवाईकांच्या कानात अजूनही घुमत आहेत.पण आईला शेवटचा निरोप देण्यासाठी निघण्यापूर्वीच त्यांच्याही हृदयाचे ठोके थांबले.दरम्यान गुरुवारी यमगर्णी येथे माय-लेकांवर एकत्रित अंत्यसंस्कार होत असताना गावातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. “आई-मुलाचे प्रेम इतके घट्ट होते की, मृत्यूनेही त्यांना वेगळे करू शकले नाही,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.