बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) घोटाळाप्रकरणी तत्कालीन आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांनी बुधवारी (दि. 17) अटक करून चौकशी सुरू केली. या चौकशीत त्यांनी आयुक्त असताना बनावट कागदपत्रे तयार करून त्या कागदपत्रांद्वारे जमीन हस्तांतरित केल्याची माहिती दिल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.
ईडीने सादर केलेली कागदपत्रे पाहून दिनेशकुमार काही मिनिटे स्तब्ध राहिले. त्यानंतर त्यांनी पुन्हा सर्व कागदपत्रे वाचली आणि त्यांची तपासणी केली. त्यांनी अशी कागदपत्रे तयार करण्याची गरज आणि त्यामागील काही लोकांबद्दल माहिती दिली. उच्च स्तरावरील लोकांच्या दबावामुळे असा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिनेश कुमार यांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हस्तांतराचा आदेश जारी करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही घटनांचे स्पष्टीकरण तपास पथकाला दिले. संबंधित काही कागदपत्रांची माहितीही दिली आहे. प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते पद सोडेपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागले याबद्दलची माहिती त्यांनी अधिकार्यांपुढे उघड केली आहे. त्यांना कुणी फोन करून काम करण्यास सांगितले, याचाही खुलासा केल्याचे सूत्रांनी सांगितले. दिनेश कुमार यांनी दिलेल्या सर्व विधानांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार्या अधिकार्यांनी त्या आधारे अधिक कागदपत्रे शोधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनेशकुमार यांनी 2022 मध्ये म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. मुडामधील जमीन वाटपात अनियमितता झाल्याच्या आरोपानंतर सरकारने त्यांची बदली केली होती. त्यांना हावेरी विद्यापीठाचे कुलसचिवपद दिले होते. त्यांना कुलसचिवपद देण्याचा मुद्दा मोठ्या वादाचा विषय असल्याने अखेर तो आदेश रद्द केला होता.