बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
सिलिकॉन सिटी बंगळूरमध्येही दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या हत्येसारखीच भीषण घटना शनिवारी (दि. 21) सकाळी उघडकीस आली आहे. एकाने तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचे आढळून आले आहे. बंगळूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व्यालीकावलमधील मुनेश्वर ब्लॉकमधील एका घराच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली.
खून झालेल्या तरुणीची ओळख पटली आहे. संशयित आरोपी परराज्यातील असून बंगळूरला स्थायिक झाला आहे. चौकशीनंतर याबाबत अधिक माहिती देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सतीश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ही तरुणी तीन महिन्यांपूर्वीच या घरात आली होती. शनिवारी सकाळी तिची आई आणि बहीण तिला भेटण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. त्यावेळी मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याचे आढळून आले. संशयिताने मृतदेहाचे 30 हून अधिक तुकडे केले आहेत. ही हत्या चार-पाच दिवसांपूर्वी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शोध सुरु आहे.