Dharwad Doctor Murder Case Pudhari
बेळगाव

Dharwad Doctor Murder Case : धक्कादायक! धारवाडमध्ये डॉक्टर पतीची हत्या, ८ वर्षांचा मुलगा जखमी; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

नातेवाईकांनी केला पत्‍नीच खून केल्‍याचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

Dharwad Doctor Murder Case : कर्नाटकातील धारवाड येथील भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नन्नवर (वय ४५) यांची राहत्या घरात हत्या झाल्याचे तसेच त्यांचा आठ वर्षांचा मुलगा जखमी अवस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. किरण हे चिरायू रुग्णालयात ॲनेस्थेशिया तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी डॉ. प्रियंका (नेत्रतज्ज्ञ) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेवेळी घरात तिघे जणच होते

हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासावरून असे दिसून येते की डॉ. किरण होन्नन्नवर राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये बाहेरची कोणतीही व्यक्ती घुसल्याची शक्यता नाही, कारण ही एक अत्यंत सुरक्षित वसाहत आहे. घटनेच्या वेळी घरात पती, पत्नी आणि मूल असे तिघेच जण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.

घटना कशी उघडकीस आली?

डॉ. किरण यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला पत्नीने सांगितले की, डॉ. किरण विश्रांती घेत आहेत. थोड्या वेळानंतर नातेवाईकांनी पुन्हा संपर्क साधल्यानंतर डॉक्टर बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंतही संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी अपार्टमेंटवर जाऊन पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना घरात जखमी अवस्थेत मूलही सापडले.

पत्नीकडून विसंगत माहिती

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर डॉक्टर किरण हे एका खोलीत मृत अवस्थेत आढळले, तर दुसऱ्या खोलीत मुलगा जखमी अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा नेमका क्रम काय होता, हे पोलीस अद्याप निश्चित करू शकलेले नाहीत. आयुक्तांनी सांगितले की, पत्नी सध्या मानसिक धक्क्याखाली आहे. ती विसंगत आणि विचित्र विधाने करत आहे. तपासकर्ते तिच्या म्हणण्याची पडताळणी करत आहेत आणि घटनेमागील हेतू शोधण्यासाठी दोन्ही कुटुंबांकडून माहिती गोळा करत आहेत.

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

डॉ. किरण होन्नन्नवर यांचे शेजाऱ्यांशी कोणताही वाद झाल्याचे संकेत मिळालेले नाहीत. तपासाचा भाग म्हणून अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी 'सबअर्बन' पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शवविच्छेदन आणि पुढील तपासानंतर हत्येचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

नातेवाईकांनी केला डॉ. प्रियंकानेच खून केल्‍याचा आरोप

डॉ. प्रियंका या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असला तरी, पोलिसांनी त्यांच्या सहभागाला दुजोरा दिलेला नाही आणि तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे दिसून येते, मात्र त्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT