बंगळूर : केंद्र सरकारने रेल्वे तिकिटांचे दर वाढविले आहेत. यामुळे सामान्य माणसांवरील बोजा वाढला आहे. इतरवेळी ऊठसूठ आंदोलन करणारे राज्यातील भाजप नेते तिकीट दरवाढीविरोधात का बोलत नाहीत. ते शांत का आहेत, असा खोचक सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. ते शुक्रवारी (दि. 26) दावणगिरीत पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, राज्यात परिवहन महामंडळांच्या बस तिकिटाच्या दरात वाढ केल्यानंतर भाजपने आकांडतांडव केले. त्यावेळी राज्य भाजपने सरकारवर अनेक आरोप केले. आता केंद्र सरकारने रेल्वेच्या तिकीट दरात वाढ केली असून, त्याची झळ सर्वसामान्य लोकांना अधिक बसणार आहे. असे असताना एकही भाजप नेता यावर बोलण्यास तयार नाही. रेल्वे तिकीट दरवाढीविरोधात त्यांनी का आवाज उठविला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुरजवळ झालेल्या बस आणि ट्रक अपघाताबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, प्रथमदर्शनी अपघाताला ट्रकचालकाची चूक असल्याचे दिसून येते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुभाजक ओलांडून बसला धडक दिली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. खासगी बस वाहतूकदारांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.