

जळगाव : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. गाडी सुटण्यापूर्वी तयार होणारा पहिला आरक्षण तक्ता (Reservation Chart) आता ८ तासांऐवजी १० तास आधी तयार करण्यात येणार आहे. हा नवा नियम ३० डिसेंबर २०२५ पासून देशभरात लागू होणार असून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातही त्याची अंमलबजावणी केली जाईल.
या बदलामुळे प्रवाशांच्या तिकिटांबाबतची अनिश्चितता कमी होणार आहे. विशेषतः प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आपले तिकिट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती लवकर मिळणार असल्याने प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी हा निर्णय अधिक उपयुक्त ठरणार आहे.
नवे वेळापत्रक असे असेल
भुसावळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘रिमोट लोकेशन’ आरक्षण केंद्रांसाठी पहिला चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक असा आहे
सकाळी ५:०१ ते दुपारी २:०० दरम्यान सुटणाऱ्या गाड्या: या गाड्यांचा पहिला चार्ट आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंत तयार केला जाईल.
दुपारी २:०१ ते रात्री ११:५९ दरम्यान सुटणाऱ्या गाड्या: गाडी सुटण्याच्या निश्चित वेळेच्या १० तास आधी पहिला चार्ट तयार केला जाईल.
मध्यरात्री १२:०० ते पहाटे ५:०० दरम्यान सुटणाऱ्या गाड्या: या गाड्यांचाही पहिला चार्ट प्रस्थान वेळेच्या १० तास आधी तयार होईल.
दुसऱ्या चार्टमध्ये बदल राहणार नाही
पहिला आरक्षण चार्ट १० तास आधी तयार होणार असला, तरी दुसरा म्हणजे अंतिम आरक्षण चार्ट तयार करण्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तो सध्याच्या प्रचलित नियमांनुसारच तयार केला जाणार असल्याचे प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.